दाऊदच्या पाकिस्तानातल्या चार पत्त्यांची इंग्लंडकडून पोलखोल!

इंग्लंडनं आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक घोटाळ्यांमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांची आणि समूहांची एक नवी यादी जाहीर केलीय. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचंही नाव आहे. या सूचीत दाऊदच्या चार पत्त्यांचाही उल्लेख आहे. हे चारही पत्ते पाकिस्तानातले आहेत.

Updated: Feb 2, 2016, 10:48 PM IST
दाऊदच्या पाकिस्तानातल्या चार पत्त्यांची इंग्लंडकडून पोलखोल! title=

लंडन : इंग्लंडनं आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक घोटाळ्यांमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांची आणि समूहांची एक नवी यादी जाहीर केलीय. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचंही नाव आहे. या सूचीत दाऊदच्या चार पत्त्यांचाही उल्लेख आहे. हे चारही पत्ते पाकिस्तानातले आहेत.
 
यावेळी दाऊदच्या संपत्तीवर इंग्लंडनं टाच आणलीय. भारतातला मोस्ट वाँटेड गुंड असलेल्या दाऊदचं नाव इंग्लंडच्या ट्रेझरी डिपार्टमेंटच्या दस्तावेजात आलं असून २७ जानेवारी रोजी ही यादी अपडेट करण्यात आलीय... आणि यामध्ये उल्लेख केल्यानुसार दाऊदचे चार पत्ते कराचीतले आहेत. 

यामध्ये दाऊद इब्राहिम कासकर घर क्र. ३७, ३० वा रस्ता, डिफेन्स, हाउसिंग अथॉरिटी कराची, घर क्र. २९, मरगल्ला रोड तसेच व्हाईट हाऊस व क्लिफ्टन येथे राहतो, असा उल्लेख आहे. 

दाऊदचं राष्ट्रीयत्व भारतीय असून त्याचा पासपोर्ट भारताने रद्द केल्यानंतर त्याने भारतीय व पाकिस्तानी अनेक बनावट पासपोर्ट केले व त्याचा गैरवापर केला आहे, असेही यात म्हटले आहे.

दाऊदविरोधात आंतरराष्ट्रीय पकड वॉरंट असून प्रथम असे वॉरंट ७ नोव्हेंबर २००३ मध्ये जारी करण्यात आल्याचा तपशील देण्यात आला आहे.

या निर्बंधांमुळे दाऊदला इंग्लंडमध्ये आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत, त्याच्या मालमत्ता आढळल्यास जप्त होतील.

जानेवारी २०१६मध्ये जारी केलेल्या या यादीत लिट्टे, खलिस्थानवादी संघटना आणि हिजबुल मुजाहिदीनचा समावेश आहे. स्थानिक नियमानुसार, या यादीत ज्यांचा उल्लेख आहे त्यांची संपत्ती देशात जप्त करण्यात येते.