www.24taas.com, झी मीडिया, बगदाद
आखाती युद्धानंतरचा सर्वात मोठा नरसंहार सध्या इराकमध्ये सुरू आहे. `इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅन्ड सिरिया किंवा इसिस` या अलकायदाचं समर्थन असलेल्या दहशतवादी गटाने इराकमधल्या तिकरत आणि मुसल या शहरांवर कब्जा केलाय.
या शहरात पकडलेल्या इराकी सैनिकांना गोळ्या घालून एकत्रितरित्या ठार मारल्याचे काही फोटोग्राफ्स दहशतवाद्यांनी प्रसिद्ध केलेत. इराकच्या लष्करी प्रवक्त्यांनी हे फोटो खरे असल्याचं मान्य केलंय.
इसिसनं आत्तापर्यंत १७०० इराकी सैनिकांचा नरसंहार केल्याचं म्हटलंय. दहशतवादी शिया नागरिकांनाही मारत असल्याची माहिती आहे. इसिसनं शहरांवर कब्जा केल्यानंतर आता इराक सरकारनं ही शहरं दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी कारवाईला सुरूवात केलीय.
`सौदी अरेबिया ते सिरीया आणि इराणपर्यंत सुन्नी पंथाचं वर्चस्व राहावं`, अशी या दहशतवादी संघटनेची विचारसरणी आहे. दरम्यान, अमेरिकेनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. इसिसचा निःपात करण्यासाठी अमेरिकेनं `यूएसएस जॉर्ज डब्ल्यू बुश` ही विमानवाहू युद्धनौका इराणच्या आखातात उभी केलीय. इराकी हवाई दलानं आता तिक्रत आणि मुसल शहरं ताब्यात घेण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे बॉम्ब वर्षाव सुरू केलाय.
भारतावरही होणार परिणाम...
इराकमध्ये सुरू असलेल्या या धुमश्चक्रीचा भारतावरही परिणाम होणार आहे. इराकमधल्या या संकटामुळे कच्चा तेलाचा भाव प्रति बॅरल १०७ डॉलर्सवर पोहोचलाय. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा भाव ११४ डॉलर प्रति बॅरल झालाय.
किरकूक पाईपलाईन वाचवण्याचा प्रयत्न कुर्दीश सेना करत आहे. किरकूक पाईपलाईनमधून प्रत्येक दिवशी ६ लाख बॅरल कच्चा तेलाचा पुरवठा होतो. तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या ओपेक या संघटनेतला इराक हा तेल उत्पादनातला दोन नंबरचा देश आहे. भारताच्या एकूण तेल आयातीपैकी १३ टक्के आयात इराकमधून होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.