www.24taas.com, इ्लामाबाद
दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचा ९० वा वाढदिवस पाकिस्तानामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे. सध्या पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा परगण्यामध्ये दिलीप कुमार यांचा जन्म झाला होता.
पेशावर येथे असणारं दिलीप कुमार यांचं वडिलोपार्जित घर पाकिस्तानी जनतेने एकत्र येऊन जतन केलं आहे. तसंच पुरातत्व विभागाने आता दिलीप कुमार, राज कपूर यांची पेशावमधील घरं ताब्यात घेऊन आता त्यांना राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला आहे.
खैबर पख्तुनवा येथील सांस्कृतिक पुरातत्व विभागाने पेशावर शहरात दिलीप कुमार यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रथमच सांस्कृतिक पुरातत्व खात्यातर्फे असा कार्यक्रम साजरा होत असल्याचं सांगण्यात येत आहे. दिलीप कुमार म्हणजेच मोहम्मद युसूफ खान यांच्या वाढदिवसासाठी सांस्कृतिक पुरातत्व मंडळाने पाकिस्तानातील नामांकीत अभिनेते, पत्रकार, वकील आणि पाकिस्तानी जनतेला या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं आहे.
या उलट, स्वतः दिलीप कुमार मात्र यंदा आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. यावर्षी राजेश खन्ना, यश चोप्रा, दारा सिंग आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या निधनामुले व्यथित झाल्याचं सांगत दिलीप कुमार यांनी यावर्षी वाढदिवस साजरा करण्यास नकार दिला आहे.