मुंबई : आयफोनचे जवळपास २० करोड आय-क्लाऊड अकाऊंटना हॅक केल्याची धमकी 'टर्किश क्राईम फॅमिली' नावाच्या हॅकर्सनी 'अॅपल' कंपनीला दिली आहे.
या डेटामध्ये शेकडो व्हिडिओ, फोटो आणि मेसेज असण्याची शक्यता आहे. इतक्या अवाढव्य डेटाची चोरी झाली तर त्याचे परिणाम किती भयंकर असतील, त्यातून किती नुकसान होईल आणि त्याची भरपाई कशी केली जाईल, याचा फक्त अंदाज केलेला बरा.
एक लाख डॉलरची गिफ्ट कार्ड्स किंवा ७५,००० डॉलरच्या बीटकॉइनचा पुरवठा केला नाही, तर हा डेटा डिलीट करण्याची धमकी हॅकर्सनी अॅपलला दिली.
दरम्यान, 'अॅपल'नं मात्र या बातमीला साफ नाकारलंय. तर दुसरीकडे युझर्सचा डाटा सुरक्षित असल्याचा दावा अॅपलनं केलाय. अॅप्पलच्या म्हणण्यानुसार, ज्या ईमेल अॅड्रेसचा दावा हॅकर्सनं केलाय ती ईमेल अॅड्रेसची लिस्ट २०१२ मध्ये लिंक्डिनच्या लीक झालेल्या डेटामधली असू शकतात.