www.24taas.com, लंडन
पाकिस्तानातल्या स्वात खोऱ्यात तालिबान्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या छोट्या मलाला युसूफजाई हिला अखेर ब्रिटनच्या हॉस्पीटलमधून सुट्टी मिळालीय.
तालिबान्यांनी डोक्यात गोळी मारल्यामुळे मलाला गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर बर्मिंघमस्थीत क्वीन एलिझाबेथ हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ वर्षीय मलाला सध्या काही दिवसांसाठी ब्रिटनमध्ये आपल्या अनिवासियांसाठीच्या निवासात कुटुंबीयांसोबत राहणार आहे. काही आठवड्यांनंतर मलालावर ‘री कन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी’ करण्यात येणार आहे. यासाठी तिला पुन्हा एकदा हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात येणार आहे. तिच्या कपाळावर लागलेल्या गोळीमुळे तिचा चेहरा आणि कवटीचा आकार सध्या बिघडला गेलाय. तो सुधारण्यासाठी तिच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी झगडणाऱ्या मलाला हिला तालिबान्यांनी मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात स्वात खोऱ्यात गोळी मारली होती. जखमी मलालाला तात्काळ रावळपिंडीच्या सैन्य हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलं होतं. पण योग्य उपचार होण्यासाठी तिला १५ ऑक्टोबर रोजी क्वीन एलिजाबेथ हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं होतं. डाव्या डोळ्याच्यावर मलाला हिला गोळी लागली होती. मलाला युसूफजाई हिला काल क्वीन एलिजाबेथ हॉस्पीटलमधून सुट्टी देण्यात आलीय, तीची प्रकृती सध्या उत्तम आहे असं हॉस्पीटलकडून स्पष्ट करण्यात आलंय.