www.24taas.com, वॉशिंग्टन
अमेरिका काँग्रेसच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदू महिलेनं भगवदगीतेवर हात ठेवून पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतलीय. भारतीय वंशाच्या तुलसी गॅबार्ड यांनी हा इतिहास रचलाय.
अमेरिकेच्या संसदेत पहिल्यांदाच एका हिंदू महिलेची निवड झालीय. आणि अमेरिकेत पहिल्यांदाच आपल्या पदाची शपथ घेताना गीतेवर हात ठेवून गोपनीयतेची शपथ घेण्यात आलीय. तुलसी गॅबार्ड यांनी हा विक्रम रचलाय. ३१ वर्षीय तुलसी यांना कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष जॉन बोहनर यांनी शपथ दिली.
‘भगवदगीतेतूनच मला जनसेवक बनायची प्रेरणा मिळालीय. माझ्या जीवनातल्या अनेक कठिण प्रसंगी गीतेतूनच मला आत्मशक्ती मिळते’ असं तुलसी यांनी म्हटलंय. आपल्या आचार विचाराचं मूळ हा हिंदू धर्मच आहे असं सांगताना तुलसी यांनी म्हटलं, ‘मी बहुवांशिक, बहुसांस्कृतिक आणि बहुधर्मीय कुटुंबात वाढलेय. माझी आई हिंदू तर पिता ख्रिश्चन आहेत… पण, त्यांनीदेखील हिंदू धर्म स्वीकारलाय. हिंदू असण्याचा त्यांना अभिमान आहे. मी तरुणवयातच अध्यात्माकडे वळलीय. वेगवेगळ्या प्रश्नांची उकल करताना मला त्यांचाच आधार मिळतो’. तुलसी गॅबार्ड यांचे वडील हवाई येथील सिनेटर आहेत तर आई शिक्षिका असून त्यांचा एक स्व तंत्र व्यावसायही आहे. भारताला भेट देण्याची तुळशी यांची तीव्र इच्छाळ असून वृंदावनला जाण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.