www.24taas.com, झी मीडिया, प्योंगयांग
उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन यानं आपल्या जवळच्या नातेवाईकांची हत्या केल्याचं सांगण्यात येतंय.
साऊथ कोरियन मीडियानं दिलेल्या बातम्यांनुसार, किमनं त्याचे काका जेंग-सोंग-थाएक यांच्या मुलांना, भावांना आणि नातवंडांनाही ठार मारलंय.
कथित रुपात भ्रष्टाचाराचा आरोप ठेऊन ६७ वर्षीय जेंग-सोंग-थाएक यांना गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेंग यांच्या कुटुंबीयांची नेमकी हत्या कधी करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण जेंग यांच्या हत्येनंतर त्यांचीही हत्या करण्यात आलीय.
हत्या करण्यात आलेल्यांमध्ये जेंग यांची बहिन जेंग-ये-सून, तिचा पती जोन-योंग-जिन आणि जेंग यांचा भाचा जेंग योंग चोल याचाही समावेश आहे. थाएक यांच्या दोन मुलांनाही ठार करण्यात आलंय. जोन योंग जिन आणि जेंग योंग चोल हे क्युबा आणि मलेशियामध्ये उत्तर कोरियाचे राजदूत म्हणून काम पाहत होते, असं सांगण्यात आलंय. थाएक यांचे दोन भाऊ आणि त्यांच्या मुलांचाही या हत्याकांडात खात्मा करण्यात आलाय.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, थाएक यांच्या हत्येनंतर डिसेंबर महिन्यात या सर्वांना उत्तर कोरिया आर्मीनं प्योंगयांगजवळच्या भागांतून अटक करण्यात आली होती. यातील काही जणांना खुलेआम गोळ्या झाडल्या गेल्या. थाएक यांच्याजवळच्या कोणत्याही व्यक्ती या हत्याकांडातून सुटू शकणार नाहीत, असं म्हटलं जातंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.