www.24taas.com,नवी दिल्ली
वॉर्टन इंडिया ईकॉनॉमिक फोरमने निमंत्रण नाकारल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अमेरिकेतील भारतीय जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा किती महत्वाचा आहे, याबाबत नागरिकांशी संवाद साधला. त्याचबरोबर जगात कुठेही जा, पण आपल्या जन्मभूमीशी, आपल्या मातीशी नाळ कायम ठेवा, असं आवाहन मोदींनी केलं.
व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरमने मोदींना मुख्य वक्ता म्हणून निमंत्रित केले होते. मात्र नंतर त्यांचे भाषण अचानक रद्द करण्यात आल्याने मोठे वादंग उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर ओवरसीज फ्रेन्ड्स ऑफ बीजेपीने मोदींच्या भाषणाचा हा कार्यक्रम आयोजित करून त्याला उत्तर दिले. अमेरिकेच्या एडिसन, न्यू जर्सी, शिकागो, इलिनॉयस या भागात हे भाषण लोकांनी ऐकले.
अमेरिका आणि कॅनडातील अनिवासी भारतीयांना मोदींनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात गुजरातच्या विकासाचे गुणगान गाताना त्यांनी काँग्रेसचा उल्लेख मात्र चाणाक्षपणे टाळला. माझी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या स्पष्ट आहे. धर्मनिरपेक्षतेचा विचार करताना `इंडिया इज फर्स्ट`, असेच मी मानतो, असे म्हणालेत.
माझ्या हातून चूका झाल्या. ते मी कबुलही करतो, मात्र विकास होत असेल तर जनता तुम्हाला माफ करते, अशा मार्मिक शब्दांत आपल्या यशाचे वर्णन मोदींनी केले. गुजरातच्या जनतेने नेहमीच विकासाला कौल देऊन देशालाही ते दाखवून दिलेय. गुजरातच्या विकासाची आज जगभरात चर्चा आहे. जेव्हा अमेरिकेत मंदी होती तेव्हाही गुजरातमध्ये विकासाची गंगा वाहत होती. ६ कोटी गुजराती जनतेच्या हितासाठी मी झटत आहे, असे यावेळी मोदींनी सांगितले.
विकास करताना स्किल डेव्हलपमेंटवर भर देण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. भारत सरकारच्या बजेटमध्ये त्यासाठी १ हजार कोटींची तरतूद असते. त्या तुलनेत एकट्या गुजरातच्या बजेटमध्ये स्किल डेव्हलपमेंटसाठी ८०० कोटींची तरतूद केली जाते, मोदी म्हणाले.