www.24taas.com, वॉशिंग्टन
अमेरिकेमध्ये सध्या काही ठिकाणी योगा अभ्यासाला विरोध होत असला तरी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांना मात्र योगासनांचं महत्त्व कळून चुकलंय. त्यामुळेच त्यांनी नुकतंच, व्हाईट हाऊसच्या परिसरात भरलेल्या ‘वार्षिक एग रोल’ या कार्यक्रमात योगासनांचं एक खास सत्र आयोजित केलं होतं.
या समारंभात योगाला विशेष प्राधान्य देण्यात आलं. यासाठी व्हाईट हाऊस परिसरात एक विशेष योग गार्डन बनवण्यात आलं. ३० हजार लोकांना या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आलंय. आरोग्यावर भर देणाऱ्या या कार्यक्रमाचं ब्रीद वाक्य आहे ‘बी हेल्दी, बी ऍक्टीव, बी यू’... आणि समारंभाचं नेतृत्व करत आहेत खुद्द मिशेल ओबामा...
अमेरिकेत अशा कार्यक्रमांमध्ये योग सत्राचा समावेश होणं ही काही नवीन बाब नाही. पण यावेळी ते खास ठरलं कारण योगांसंदर्भातला खटल्याची सुनावणी सध्या इथं सुरू आहे. अमेरिकेतल्या काही शाळांनी मुलांना शाळेत योगाभ्यास शिकवण्यावर आक्षेप घेतलाय.
विशेष म्हणजे, या खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीशांनी खटल्याच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट केलंय की ते खुद्द योगासनं करतात... वर त्यांनी ‘यावर कुणाचा आक्षेप आहे का?’ असा प्रश्नही विचारला.