www.24taas.com, झी मीडिया, थायलंड
थायलंडच्या पंतप्रधान यिंग्लुक शिनावात्रा यांची सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी हकालपट्टी करण्यात आली आहे. बँकाकमधील न्यायालयाने ही हकालपट्टी केली आहे.
या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या घटनापीठाने शिनावात्रा आणि त्यांचे मंत्रिमंडळ रद्दबातल ठरविले आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे अस्वस्थ थायलंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
थायलंडमधील एका ज्येष्ठ नागरी अधिकाऱ्याची बदली शिनावात्रा यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
शिनावात्रा यांच्या निर्णयामध्ये त्यांचे मंत्रिमंडळही सहभागी होते, असे निरीक्षण न्यायालयाने या वेळी नोंदविले.
या ज्येष्ठ नागरी अधिकाऱ्याची बदली ही शिनावात्रा यांच्या राजकीयदृष्ट्या बलशाली असलेल्या कुटुंबास फायदा मिळावा, या छुप्या हेतूनेच केली गेली आणि यामुळे राज्यघटनेचे उल्लंघन झाल्याचे मत या घटनापीठाने व्यक्त केले.
आता थायलंडमध्ये शिनावात्रा यांच्यासह नऊसदस्यीय मंत्रिमंडळाच्या हकालपट्टीनंतर अद्याप काळजीवाहू सरकार बनविण्यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.