www.24taas.com, संयुक्त राष्ट्र
संयुक्त राष्टांनी पाकिस्तानी युवती आणि मानवाधिकार कार्यकर्ती मलाला युसूफजई हिचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस ‘मलाला दिवस’ म्हणून साजरा केलाय. मुलींच्या शिक्षा अभियानासाठी झगडणाऱ्या मलाला हिला तालिबान्यांनी मागच्या महिन्यात डोक्यात गोळी मारली होती.
संयुक्त राष्ट्र महासाचिव बान की मून यांचे विशेष दूत ब्रिटनचे माजी पंतप्रधान गार्डन ब्राऊन यांनी १० नोव्हेंबर हा दिवस मलाला दिवस म्हणून घोषित केलाय. जागतिक शिक्षा अभियानाला यामुळे प्रोत्साहन मिळू शकेल अशी त्यांना आशा आहे. या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण जगभरातील सर्व देश, सांप्रदाय, लिंग आणि क्षेत्रांतील लोकांना मलाला हिच्यासोबत दाखवलं जाणार आहे.
‘आम्ही मलाला आहोत, हा दिवसच मलालाचा आहे. तिनं दाखवलेलं धाडस नजरेसमोर ठेऊन जगानं तिच्या पावलांवर पाऊल ठेवायला हवं. मलाला युसूफजई आशेची एक मूर्ती आणि साहसाचं एक आंतरराष्ट्रीय प्रतिक बनलीय. तिनं आपल्या धाडसानं लाखो तरुणींचं ह्रदय जिंकलंय. मलाला हे एक असं स्वप्न आहे जिथं तिच्यासारख्या अनेक मुली आणि तिच्यानंतरच्या अनेक पिढ्या स्वतंत्र होऊन शाळेत जाऊ शकतील आणि प्रगती करू शकतील’ असं ब्राऊन यांनी यावेळी म्हटलंय.