सईदबाबत अमेरिकेकडे पुरावा नाही - पाक

अमेरिकेकडे लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि जमात-उल-दावाचा प्रमुख हफीज सईद याच्याविरुद्ध सबळ पुरावा नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेचा दावा फोल ठरण्याची शक्यता आहे.

Updated: Apr 5, 2012, 11:16 PM IST

www.24taas.com,इस्लामाबाद

 

 

अमेरिकेकडे लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि जमात-उल-दावाचा प्रमुख हफीज सईद याच्याविरुद्ध सबळ पुरावा नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेचा दावा फोल ठरण्याची शक्यता आहे. तर पाकिस्तान अमेरिकेला गुंगारा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकरण अमेरिका कसे हाताळते याकडे लक्ष लागले आहे.

 

 

हफीज सईद  याच्याविरुद्ध  पुराव्याअभावी कारवाई केली जाणार नाही, असे पाकिस्तानने स्पष्ट करीत गुरुवारी पाक सरकारने म्हटले आहे, की सईदचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे ठोस पुरावे अमेरिकेकडे नाहीत. त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे सादर केल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र पुरावे नसताना कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे अमेरिकेला पाकने बजावले आहे.

 

 

पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल बसित यांनी म्हटले,  हफीज सईद आणि त्याचा सहकारी अब्दुल रहमान मक्की यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी अमेरिकेने मोठे इनाम जाहीर करणे ही हास्यास्पद घटना आहे. या दोघांचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे पुरावे अमेरिकेकडे नाहीत. त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही.