पाटना: अभिनेता आमीर खाननं सलमानला आपला खूप चांगला मित्र असल्याचं म्हणत सलमानच्या लग्नाबद्दल एक वक्तव्य केलंय. ‘सलमान साहब’ कधी लग्न करणार याचं उत्तर तर हकीम लुकमानच्या जवळ पण नाही, असं चुटकी घेत आमीरनं सांगितलं.
आपला आगामी चित्रपट ‘पीके’च्या प्रमोशनसाठी आलेला आमीर म्हणाला, सलमान माझा खूप चांगला मित्र आहे आणि आमच्या दोघांच्याही मनात एकमेकांविषयी प्रेम आहे. सलमान लग्न कधी करणार हे आमीरला विचारताच तो हसला आणि म्हणाला, याबाबत त्यानं सलमानला खूप आग्रह केला पण याचं उत्तर तर हकीम लुकमानजवळ सुद्धा नाहीय.
‘अंदाज अपना-अपना’च्या रिमेकबद्दल विचारलं असता आमीरनं सांगितलं, “यासंदर्भात सध्या तरी काही योजना नाहीय, जर असं काही होईल तर मला खूप मज्जा येईल.” अंदाज अपना-अपना २ची पटकथा लिहिण्यासाठी त्यानं राज संतोषी यांना अनेकदा सांगितलंय.
शाहरूखसोबत फिल्म करणार का? याबाबत विचारलं असता आमीरनं “कथा चांगली असेल तर नक्कीच मला त्याच्यासोबत काम करायला आवडेल”, असं आमीर म्हणाला. तर तिन्ही खान एकत्र येतील का? असं विचारल्यानंतर तिघांनी एकाच चित्रपटात काम केलं तर प्रेक्षकांसोबत आम्हाला पण मज्जा येईल, असं आमीर म्हणाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.