‘फर्लो’ रजेचा घोळ, संजय दत्तच्या शिक्षेत वाढ!

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा झालेला चित्रपट अभिनेता संजय दत्त रजा (फर्लो) संपल्यानंतरही तुरुंगात हजर न झाल्यामुळं त्याच्या शिक्षेत आता आणखी चार दिवसांची वाढ होणार आहे. तसंच ‘फर्लो’च्या मुदतवाढीसाठी संजय दत्तनं केलेल्या अर्जावर निर्णय घेण्याबाबत घोळ घालणार्‍या अधिकार्‍यांवरही कडक कारवाई केली जाईल, असं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज सांगितलं.

Updated: Feb 19, 2015, 08:12 AM IST
‘फर्लो’ रजेचा घोळ, संजय दत्तच्या शिक्षेत वाढ! title=

मुंबई: मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा झालेला चित्रपट अभिनेता संजय दत्त रजा (फर्लो) संपल्यानंतरही तुरुंगात हजर न झाल्यामुळं त्याच्या शिक्षेत आता आणखी चार दिवसांची वाढ होणार आहे. तसंच ‘फर्लो’च्या मुदतवाढीसाठी संजय दत्तनं केलेल्या अर्जावर निर्णय घेण्याबाबत घोळ घालणार्‍या अधिकार्‍यांवरही कडक कारवाई केली जाईल, असं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज सांगितलं.

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी संजय दत्त याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगणार्‍या संजय दत्त याला वारंवार ‘फर्लो’च्या तरतुदीनुसार सुट्टी दिली जात असल्यानं त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यातच ‘फर्लो’ची मुदत संपल्यावरही तो तुरुंगात हजर न झाल्यानं गदारोळ उठला होता.

रजेच्या काळात संजय दत्त यानं मुदतवाढीसाठी तुरुंग प्रशासनाकडे अर्ज केला, परंतु या अर्जावर वेळेत निर्णय झाला नाही. अर्ज प्रलंबित असल्यानं तुरुंग अधिकार्‍यांनी त्याला परत तुरुंगात घेतलं नाही आणि आणखी दोन दिवसांची जादा सुट्टी मिळाली. संजय दत्त याला मिळणार्‍या विशेष सवलतीबद्दल काहूर उठल्यानं या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीचा अहवाल गृह विभागाकडे आला आहे. मुदतवाढीच्या अर्जावर वेळेत निर्णय घेण्यात हलगर्जीपणा करणार्‍या तुरुंग अधिकार्‍यांवर तसंच पोलीस अधिकार्‍यांची विभागीय चौकशी केली जाणार असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितलं.

८ जानेवारी रोजी संजय दत्तची १४ दिवसांची ‘फर्लो’ रजा संपत होती त्या दिवशी सूर्यास्ताआधी त्यानं तुरुंगात हजर होणं अपेक्षित होतं. तसा तो येरवडा कारागृहात गेलाही होता, पण त्याची अधिकची १४ दिवसांची ‘फर्लो’ रजा मंजूर होणं बाकी होतं. त्याबाबत स्पष्टता नसल्यामुळं त्याला तुरुंगात घेण्यात आलं नाही. संजय दत्तनं केलेला वाढीव रजेचा अर्ज संबंधित अधिकार्‍यांनी पोलीस रिपोर्ट घेण्यासाठी मुंबई आयुक्तांकडे तसंच तुरुंग उपमहानिरीक्षकांकडे पाठवायचा होता. तो वेळेत गेला नाही. आधुनिक संपर्क साधनं असतानाही साध्या टपालानं अर्ज पुढे गेला. वेळेत त्यावर निर्णय केला गेला नाही. या सर्व त्रुटी नवीन जेल मॅन्युअलमध्ये दूर करण्यात येतील असंही शिंदे म्हणाले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.