फिल्म रिव्ह्यू : 'दावत-ए-इश्क'मधून तडका गायब!

‘दावत ए इश्क’ या सिनेमाचे आत्तापर्यंतचे प्रोमोज बघून तुम्हाला हा सिनेमा जेवणावर, खाद्यपदार्थांवर आधारलेली ‘लव्ह स्टोरी’ वाटत असेल. पण, या सिनेमाचं कथानक आधारलंय ते हुंड्यासारख्या गंभीर प्रश्नावर, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Updated: Sep 20, 2014, 03:58 PM IST
फिल्म रिव्ह्यू :  'दावत-ए-इश्क'मधून तडका गायब! title=

मुंबई : ‘दावत ए इश्क’ या सिनेमाचे आत्तापर्यंतचे प्रोमोज बघून तुम्हाला हा सिनेमा जेवणावर, खाद्यपदार्थांवर आधारलेली ‘लव्ह स्टोरी’ वाटत असेल. पण, या सिनेमाचं कथानक आधारलंय ते हुंड्यासारख्या गंभीर प्रश्नावर, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

पण, या सिनेमाला ‘तडका’ मात्र व्यवस्थित बसलेला दिसत नाही. सिनेमाची सुरुवात अतिशय मंद गतीने होते... तसाच तो सिनेमा पुढे मध्यंतरापर्यंत चालत राहतो... आणि मग, एखाद्या ‘लव्ह स्टोरी’चा जसा शेवट होतो तसाच या सिनेमातील महत्त्वाच्या पात्रांच्या भूमिकाही संपतात. जणू दिग्दर्शकाला सिनेमा लवकर संपविण्याची घाई झालीय, असंही वाटेल.

सिनेमाचं कथानक
हैदराबादमधील गुलरेज (परिणीति चोपडा) एका दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करतेय. तिचं स्वप्न आहे फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घ्यायला अमेरिकेत जाण्याचं... पण, तिच्या वडिलांना (अनुपम खेर) मात्र आपल्या मुलीचे लवकरात लवकर दोनाचे चार हात करण्याची घाई झालीय.

पण, त्यांच्याकडे हुंडा देण्यासाठी पुरेसे पैसेही नाहीत. त्यामुळे गुलरेजला अनेक मुले नकार देतात. या सर्व गोष्टीला बाप-लेक कंटाळून जातात. मग दोघे बाप-लेक एक प्लॉन करतात. एखाद्या नवख्या शहरात जाऊन हुंडा मागणाऱ्या एखाद्या गडगंज कुटुंबाचं बोलणं छुप्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायचं आणि हुंडाविरोधी कायद्याचा आधार घेत कुटुंबाकडून बक्कळ पैसा उकळायचा, असा बेत दोघं बाप-लेक पक्का करतात

मग, आपला उद्देश्य साध्य करण्यासाठी दोघंही लखनऊला दाखल होतात. इतं गुलरेजची मुलाखत एका रेस्टॉरंटचा मालक तारिक (आदित्य रॉय कपूर) याच्याशी होते. तारिक आणि गुलरेज दोघे ऐकमेकांच्या प्रेमात पडतात. पण, गुलरेज ही तिच्या प्लॉनच्या हिशोबाने ८० लाख रुपय घेऊन हैदराबालला परत येते... पण, तारिकचं प्रेम मात्र तिच्या मनातून जात नाही... आणि काही घडामोडी घडत हे दोघे पुन्हा एकत्र येतात... हे ढोबळ मानानं सिनेमाचं कथानक 

अभिनय आणि दिग्दर्शन
सिनेमाचा विषय तसा नवीन आणि मनोरंजक होता. पण, दिग्दर्शक मात्र या विषयाला योग्य न्याय देण्यात अपयशी ठरलाय. त्यामुळे सिनेमा थोडा कंटाळवाना वाटत राहतो. अनुपम खेरनं त्याच्या पद्धतीने कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला आहे. परिणितीही आत्तापर्यंत केलेले रोलच परत करतेय, असं वाटत राहतं. आदित्य रॉय कपूरची भूमिका फारशी फुलवली गेलेली दिसत नाही. पण, जेवढं काही त्याच्या वाट्याला आलंय त्यानं आपली भूमिका चांगली निभावली, असं म्हणावं लागेल. 

दिग्दर्शकाचा गोंधळ सिनेमात स्पष्टपणे दिसून येतोय... सिनेमा हुंडा समस्येवर आहे की ही लव्ह स्टोरी आहे की जेवणाशी संबंधित... याचा घोळ प्रेक्षकांमध्ये राहतो. परिणीति-आदित्य यांची लव्ह स्टोरीही आणखीन चांगल्या पद्धतीनं मांडता आली असती. दुसऱ्या भागात सिनेमातील घटना या गतिमान होताना आपल्या दिसून येतात. मग शेवटी सिनेमा हा साध्या पद्धतीने संपून जातो.

शेवटी काय तर....
दिग्दर्शक हबीब फैजलनं ‘दो दूनी चार’, ‘इशकजादे’ यासाख्या चांगले सिनेमे बनविले होते. त्यानं लिहलेला ‘बँड बाजा बारात’ हा सिनेमाही लोकांच्या पसंतीस उतरला होता. ‘दावत-ए-इश्क’ हा संपूर्ण कुटुंबासोबत बसून पाहू शकतो, असा सिनेमा आहे. पण, या सिनेमाच्या विषयासोबतच स्क्रिप्टवर काम करता आलं असतं.

तर मग या विकेन्डला कुटुंबासोबत एखादा सिनेमा पाहण्याचा प्लान करत असाल तर हा सिनेमा एकदा नक्कीच पाहू शकता... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.