मुंबई : महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' या सिनेमाने झी स्टुडिओ आणि मराठीमध्ये विक्रम केलाय. आतापर्यंत मराठीत सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय. 'नटसम्राट'ने ३५.१० कोटी रुपयांची कमाई चौथ्या आठवड्यातच केली. लय भारी, दुनियादारी, टाईमपासला या सिनेमांना 'नटसम्राट'ने मागे टाकले आहे.
'नटसम्राट'मधील दमदार डायलॉग्स 'कुणी घर देता का घर...' यांनी रसिकांवर मोहीनी घातलेय. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट'ने मराठी सिनेमात रेकॉर्ड नोंदवलाय. १९० थिएटरमध्ये ३८० शो सुरु असून हा चौथा आठवडा आहे. दरम्यान, २२ जानेवारीपासून या सिनेमात नवीन सीन अॅड करण्यात आलेत. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी कमाई करुन मराठीत नवा रेकॉर्ड करण्याची शक्यता अधिक आहे. मराठी सिनेमात एवढा गल्ला कोणताही सिनेमा जमवू शकलेला नाही.
दुनियादारीने २६ कोटी, टाईमपास -२ ने २८ कोटी तर टाईमपास-१ने ३२ कोटींची कमाई केलेय. अभिनेता रितेश देशमुखच्या लय भारीने ३५ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा विक्रम 'नटसम्राट'ने मोडीत काढत आपल्या नावावर केलाय.
तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या अलौकिक प्रतिभेने विस्तारलेले मराठीतील नाटक म्हणजेच 'नटसम्राट'. आजही अनेकांना या नाटकाचे संवाद पाठ आहेत. मराठी रंगभूमीवर आपल्या कथानकाने अजरामर ठरलेले 'नटसम्राट' सिनेमाच्या रुपात रुपेरी पडद्यावर झळकले आहे. यात नाना पाटेकर याने नटसम्राट अाप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका साकारलेय. ही भूमिका लोकांच्या पसंतीस पडलेय.
ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्यानंतर राम जाधव, सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी, गिरीश देशपांडे यांनी हेही नटसम्राट अाप्पासाहेब बेलवलकर झाले होते. यांनी साकारलेली ही भूमिका अजरामर झालेय.