मुंबई : बॉलीवूडनंतर हॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवू इच्छिणारी प्रियांका चोप्रा आता मराठीतही दिसणार आहे. प्रियंका एका मराठी चित्रपटाची निर्मिती करतेय. 'पर्पल पेबल पिक्चर्स' असं तिच्या कंपनीचं नाव आहे. या कंपनीची निर्मिती असणारा पहिला मराठी चित्रपट 'व्हेंटिलेटर'च्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे.
प्रियांकाने तिच्या कंपनीच्या माध्यमातून तीन प्रादेशिक भाषांतील चित्रपटांची निर्मिती करण्याची सुरुवात करण्याची घोषणा प्रियांकाने गेल्याच महिन्यात केली होती. बुधवारी त्यांनी 'व्हेंटिलेटर'च्या चित्रीकरणाचा शुभारंभ केला. याचा एक फोटो खुद्द प्रियांकाने इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. चित्रपटाच्या शुभारंभावेळी केल्या जाणाऱ्या पूजेचा तो फोटो आहे.
याच कंपनीची निर्मिती असलेले भोजपुरी, पंजाबी आणि मराठी असे तीन चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहेत. कंपनीने जारी केलेल्या एका पत्रकानुसार या कंपनीच्या माध्यमातून कोणत्याही भाषेच्या बंधनाशिवाय चांगल्या कथा आणि चांगले कुशल कलाकार प्रेक्षकांसमोर आणणे, हे तिचं उद्दिष्ट असणार आहे.
'फेरारी की सवारी' या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. यात मराठीतील अनेक अनुभवी कलाकार असणार आहेत. सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.