चेन्नई : दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतचा कबाली सध्या चांगलाच गाजतोय. इतका मोठा स्टार असूनही रजनीकांत यांचं राहणीमान किती साधं आहे याचा प्रत्यय देणारी घटना काही दिवसांपूर्वीच घडली.
रजनीकांत एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन झाल्यावर विश्रांतीसाठी म्हणून ते बाहेर बसले. इतक्यात एक महिला त्यांच्याजवळ आली. तिने १० रूपयांची नोट त्यांना देऊ केली. खरंतर हा एखादा भिकारी आहे असा तिचा समज झाला होता. पण रजनीकांत यांनी जराही तक्रार न करता आणि अतिशय विनम्रपूर्वक ती नोट स्वीकारली.
काहीवेळाने रजनीकांत त्यांच्या गाडीजवळ गेले. तेव्हा त्या महिलेला आपल्या चुकीची जाणीव झाली. आपण ज्याला पैसे दिले तो भिकारी नसून आपला लाडका सुपरस्टार असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने लगेच जाऊन त्यांची माफी मागितली. यावेळीही तिला त्यांच्या विनम्रपणाचा प्रत्यय आला. “जे झालं ते चांगलंच झालं. आपले पाय नेहमी जमिनीवर राहिले पाहिजेत, असंच देव मला नेहमी सांगत असतो. माझी ओळख एखाद्या सुपरस्टारची नसून सामान्य माणसाचीच आहे” अशा शब्दांत रजनीकांत यांनी तिची समजूत काढली.
त्या महिलेचे नाव डॉ. गायत्री असून त्यांनी स्वतः लिहिलेल्या एका पुस्तकात याचा उल्लेख केलाय.