मुंबई : भारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित 'सचिन- ए बिलियन ड्रीम्स' हा सिनेमा या आठवड्यात रसिकांच्या भेटीला येतोय.
सिनेमा रिलीज होण्याआधी त्याच्या स्क्रीनिंगची परंपरा बॉलीवुडमध्ये सुरु आहे. बॉलीवुडच्या दिग्गज कलाकार आणि मान्यवरांसाठी हे स्क्रीनिंग ठेवलं जातं. मात्र, मास्टर ब्लास्टर सचिननं यांतही आपलं वेगळंपण सिद्ध करत आपल्या सिनेमाचं पहिलं स्क्रीनिंग हे भारतीय वायुदलातील अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलं.
या स्क्रीनिंगला वायुदलातील अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सिनेमा करण्याचं ज्या दिवशी ठरलं त्याच दिवशी ठरवलेलं की या सिनेमाचं पहिलं स्क्रीनिंग हे वायुदलाच्या अधिकाऱ्यांसाठी करायचं अशी प्रतिक्रिया सचिननं दिलीय.
तर सचिनच्या जीवनावरील हा सिनेमा अप्रतिम असल्याचं वायुदल प्रमुख बी.एस.धनोआ यांनी म्हटलंय. ज्या दिवशी सचिनचा सिनेमा रिलीज होतोय त्याच दिवशी कारगिर एअर ऑपरेशन्स सुरु करण्यात आले होते हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
उल्लेखनीय म्हणजे, २०१५ साली 'इंडियन एअरफोर्स'च्या ८३ व्या वर्षशताब्दीला सचिन तेंडुलकरला मानद 'ग्रुप कॅप्टन' पदवी प्रदान करण्यात आली होती.