मुंबई: नव्या सरकारचं खातेवाटप जवळपास निश्चित झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खाते असेल, तर अत्यंत महत्त्वाचे वित्त खाते सुधीर मुनगंटीवार सांभाळतील.
उच्च व तंत्रशिक्षण तसंच शालेय शिक्षण हे दोन विभाग एकत्र करून मनुष्यबळ विकास असं नवं खातं निर्माण करण्यात येणार आहे. विनोद तावडे हे या खात्याचे मंत्री असतील.
चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार, विष्णू सवरा यांना आदिवासी विकास तर पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास खातं असेल, असंही विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं. मुख्यमंत्री फडणवीस हे वित्त आणि गृह हे दोन विभाग आपल्याकडेच ठेवतील, असं आधी म्हटलं जात होतं. पण विदर्भातीलच त्यांचे सहकारी मुनगंटीवार यांच्याकडे त्यांनी वित्त खातं दिलं आणि गृह व नगरविकास स्वत:कडे ठेवलं.
गृहमंत्रीपदाचे दावेदार असलेले विनोद तावडे यांना शिक्षणाशी संबंधित विविध खाती एकत्र करून मनुष्यबळ विकास खातं देत त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.