मुंबई: भाजपनं सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाताना, देवेंद्र फडणवीस सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे. ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान विधीमंडळाचं अधिवेशन होणार असून ६ नोव्हेंबररोजी भाजपाला विधीमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. ६ नोव्हेंबररोजी विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. त्यामुळं विधीमंडळातील विश्वासदर्शक ठरावात उत्तीर्ण होण्यासाठी भाजपाला अथक मेहनत घ्यावी लागेल असं दिसतंय.
राज्याच्या इतिहासात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री होत असल्यानं पक्षामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्तीही पक्षानं केलीय. आता तयारी सुरू आहे ती जंगी शपथविधी सोहळ्याची.. हा सोहळा आटोपला की भाजपला विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या कसोटीला सामोरं जावं लागणार आहे.
विधानसभेत २८८ आमदार असले तरी भाजप आमदार गोविंद राठोड यांच्या निधनामुळं संख्याबळ २८७ झालंय. बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारला १४४ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. भाजपकडे १२२ आमदारांचे संख्याबळ आहे. याशिवाय ७ अपक्ष आमदार आणि इतर लहान पक्षांचे ७ आमदार असे मिळून ही संख्या १३६ वर जाते. बहुमतासाठी अजूनही ८ आमदारांची भाजपला आवश्यकता आहे.
मात्र तरीही बहुमत सिद्ध करायला भाजपला कुठलीही अडचण येणार नाही. शिवसेनेबरोबर सुरू असलेली पाठिंब्यासाठीची चर्चा यशस्वी झाली तर भाजप सहज बहुमत सिद्ध करू शकतो. अन्यथा राष्ट्रवादीनं घेतलेल्या भूमिकेचा फायदा भाजपला बहुमत सिद्ध करायला होणार आहे.
कारण राष्ट्रवादीकडे ४१ आमदार आहेत. हे आमदार विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तटस्थ अथवा गैरहजर राहणार आहेत. त्यामुळं २८७ आमदारांमधून राष्ट्रवादीचे तटस्थ राहणारे ४१ आमदार वगळले तर संख्या २४६ वर खाली येते. त्यामुळं विश्वासदर्शक ठराव संमत करण्यासाठी १२४ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. भाजपचे स्वतःचे १२२ आणि इतर मिळून १३६चं संख्याबळ असल्यानं विश्वासदर्शक ठराव संमत करायला भाजपाला अडचण येणार नाही.
दरम्यान, सरकार चालवण्यासाठी राष्ट्रवादीच्या या कुबड्या भाजपला कायमस्वरूपी नकोत. कारण कधीही सरकार पाडण्याची धमकी देऊन राष्ट्रवादी ब्लॅकमेल करू शकते, अथवा राष्ट्रवादीविरोधातील काही मंत्र्यांवरील कारवाई थांबवण्यासाठी दबाव टाकू शकते अशी भीती भाजपाला वाटतेय. त्यामुळे भाजपाने अजून १० आमदार जमा करण्याची रणनिती आखलीय.
त्यानुसार शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील १० आमदार फोडण्याच्या हालचाली सुरू होणार आहेत. सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर या रणनितीवर काम केलं जाण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.