मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधलाय.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाकाच भाजपकडून सुरू होतोय. यावरच राज ठाकरेंनी भाजपला चिमटा काढलाय. ‘जर मोदी प्रचार करणार असतील तर मग पंतप्रधानपदाचं काम कोण करणार?’ असा प्रश्न राज ठाकरेंनी एका मुलाखतीत विचारलाय.
यावेळी, राज ठाकरेंनी शिवसेना-भाजप युती तुटण्यावरही भाजपला फटकारलंय. उद्धवला अगोदरच समजायला हवं होतं की भाजप विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. भाजपला युती टिकवायचीच नव्हती, हे उद्धवला समजलं नाही... भाजप नेते बोलतात काही वेगळंच आणि करतात भलतंच, असंही राज ठाकरेंनी म्हटलंय.
यावेळी, राज ठाकरे यांनी राज्यात राष्ट्रीय पक्षांची गरज काय? असाही सवाल केलाय. राष्ट्रीय पक्षांनी केंद्रावर लक्ष केंद्रीत करायला हवं, असा सल्लाही त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला दिलाय. महाराष्ट्रात भाजपला चेहराच नाही... त्यामुळेच त्यांना मोदींना इथं घेऊन यावं लागतंय. जर प्रत्येक विधानसभा निवडणुकांत मोदींनाच प्रचारासाठी उतरावं लागलं, तर ते पंतप्रधानपदाचं काम कधी आणि कसं करणार? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.