मुंबई : नितीन गडकरी आता दिल्लीच्या राजकारणात सेट झालेत... पण महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली तर ते मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असतील, अशी खात्री भाजपवाल्यांना आहे...
दिल्लीच्या राजकारणात
कित्येक वर्षं राजकारणात मुरलेले नितीन गडकरी यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला उभे राहिले... नागपूर या आपल्या होम पीचवरून... तब्बल सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या काँग्रेसच्या विलास मुत्तेमवारांना गडकरींनी पराभवाचं पाणी पाजलं... ते देखील 3 लाख मतांनी... एवढंच नव्हे तर विदर्भातल्या सर्वच्या सर्व 10 जागांवर भाजपचे खासदार निवडून आले. स्वातंत्र्यानंतर असं पहिल्यांदाच घडलं होतं... त्याचं श्रेय जातं अर्थातच नितीन गडकरींना.... महाराष्ट्रातून 48 पैकी युतीचे 42 खासदार विजयी झाले. अब की बार.. मोदी सरकार ही घोषणा प्रत्यक्षात साकार झाली. भाजपच्या या देदिप्यमान विजयामध्ये सिंहाचा वाटा असलेल्या गडकरींना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला.
संघाचा कार्यकर्ता ते भाजप अध्यक्ष
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा साधा कार्यकर्ता... संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूरातच गडकरी वाढले. संघाच्या मुशीत घडलेल्या गडकरींच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरला तो 1975 मधला आणिबाणीचा काळ..
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून ते सक्रीय राजकारणात उतरले. 1989 मध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. 1999 ते 2005 या काळात विरोधी पक्षनेतेपद सांभाळताना, आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडलं. 2004 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष झाले... आणि 2009 मध्ये तर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे सर्वात तरूण राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याचा बहुमान पटकावला... पण त्यांच्या राजकीय कारकीर्दीत सर्वात लक्षवेधी ठरली ती युती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून त्यांनी पाडलेली छाप... मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे असो, मुंबईत बांधलेले 55 उड्डाणपूल असोत, नाहीतर मेळघाटसारख्या दुर्गम भागातील रस्त्यांचे जाळे असो... मंत्री म्हणून गडकरींचं काम एवढं प्रभावी होतं की, त्यांचं 'ब्रिजभूषण पूलकरी' असं नवं बारसंच झालं...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गडकरींच्या कामाची नेहमीच तारीफ करत. केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचं सरकार आल्यानंतर राष्ट्रीय रस्ते विकास समितीचं अध्यक्षपद गडकरींना देण्यात आलं. त्यांनी जो अहवाल सरकारला दिला, त्यावरून 60 हजार कोटी रूपयांची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आकाराला आली...
गडकरींची खासियत
राजकारण हाच गडकरींचा प्रांत नव्हता... त्याला समाजकारणाची जोड त्यांनी दिली. जल व्यवस्थापन, सौरऊर्जेचा वापर, शेतीमध्ये नवनवे प्रयोग, इथेनॉलमिश्रीत इंधन, हजारो गरजूंवर हृदय शस्त्रक्रिया, ई-रिक्षा असे सामाजिक उपक्रम गडकरींनी आपल्या विविध सेवभावी संस्थांच्या माध्यमातून राबवले. विकासाची दूरदृष्टी असलेला आणि नवनवे कल्पक प्रयोग राबवणारा नेता अशी त्यांनी ओळख बनलीय. सरकारी अधिका-यांकडून कामं कशी करून घ्यायची, याचं गडकरींचं स्वतःचं असं खास टेक्निक आहे. त्यांची आणखी एक खासियत म्हणजे खाण्याची आणि खिलवण्याची आवड... कुणाचंही हृदय जिंकायचं असेल तर त्याचा मार्ग पोटातून जातो, हे वैश्विक सत्य गडकरींनी सप्रमाण सिद्ध केलं... राजकीय मतभेद असले तरी विविध पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचं संबंध असण्याचं तेच कारण आहे. त्यामुळंच मोठी टीका झाली तरी आपल्या मुलाचं लग्न त्यांनी थाटामाटात आणि धूमधडाक्यात लावून दिलं. कित्येक दिवस गडकरींच्या घरी जेवणावळी सुरू होत्या... करायचं ते दणक्यात, हा गडकरींचा स्थायीभावच आहे.
अखंड महाराष्ट्राच्या नेतृत्वाची संधी?
त्यामुळं आता केंद्रात भाजपची सत्ता आली असताना आणि मोदी सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री म्हणून त्यांच्या शब्दाला वजन असताना, ते पुन्हा महाराष्ट्रात परततील का, अशी शंका घेतली जातेय. स्वतः गडकरींनी आपणाला महाराष्ट्रात परतण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलंय. पण महाराष्ट्रात भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले तर गडकरी हेच मुख्यमंत्री असतील, अशी खात्रीच पक्षातील गडकरी समर्थकांना आहे. अखंड महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी विदर्भवीर गडकरींना मिळेल का, याचा फैसला येणा-या निवडणुकीत होणार आहे...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.