यवतमाळ : अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला यवतमाळचा आर्णी विधानसभा मतदारसंघ. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे येथून प्रतिनिधित्व करतात.
काँग्रेसचा सुरुवातीपासून बालेकिल्ला असलेला पूर्वीचा केळापूर मतदार संघ आता आर्णी मतदारसंघ झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री शिवाजीराव मोघे येथून ५ वेळा विजयी झाले असून दोन वेळा त्यांना पराभवाचाही सामना करावा लागला आहे. भाजपाचे डॉ. संदीप धुर्वे यांनी त्यांना धूळ चारली होती. काँग्रेस ने तिकीट नाकारल्याने १९९५ मध्ये अपक्ष निवडणूक लढवत मोघे विजयी झाले आणि युती सरकारला पाठींबा दिला.
आर्णी, घाटंजी आणि पांढरकवडा तालुका मिळून आर्णी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात आर्णी मतदारसंघाचा समावेश होतो. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना ९०,८८२ मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या उत्तम इंगळे यांना ५३,३०१ मतांवर समाधान मानावं लागलं. या रंगतदार निवडणुकीत मोघे यांनी ३७५८१ मताधिक्याने विजयश्री मिळवली.
आमदारांची कामे :
आर्णी जवळा येथे १३२ केव्हीचे विद्युत उपकेंद्र उभारण्यात आले., पांढरकवडामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरु, खुणी नदी आणि घाटी येथील नदीवर पूल मंजूर , आर्णी पाणीपुरवठा योजनेसाठी ४५ कोटी निधी उपलब्ध, वनजमिनीचे पट्टे आणि घरकुल वाटप योजना राबविल्याचे मोघे सांगतात.
शिवाजीराव मोघे २५ वर्षांपासून या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करतात सातत्यान मंत्रीपद त्यांनी उपभोगंलय. मात्र त्याचा विकासकामासाठी फारसा फायदा झाला नसल्याची टीका विरोधक करताहेत.
काय आहेत समस्या..
आर्णी विधानसभा क्षेत्रात अनेक समस्या वर्षानुवर्ष रखडल्याची खंत इथले नागरिक व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय नाही., रस्त्यांची प्रचंड दैयनिय अवस्था आहे., आदिवासी विकास प्रकल्पाच्या योजना रखडल्या आहेत., घरकुल योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित आहेत., उद्योगांची वाणवा असल्याचे दिसत आहे.
पाहा व्हिडिओ
लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाचे हंसराज अहीर यांना तब्बल ५९ हजार ८१४ मतांची आघाडी मिळाल्याने काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. भाजपाकडून प्रामुख्याने माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी त्यांचे बंधू मिलिंद धुर्वे हे देखील मोर्चेबांधणी करीत होते. माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या मतदारसंघावर शिवसेनेनंही दावा केला होता. आता तर युती तुटल्याने स्वतंत्र ते लढत आहेत. येथे शिवसेना संदीप दुर्वे, भाजप राजू तोडसम, काँग्रेस शिवाजीराव मोघे, राष्ट्रवादी विष्णू उकंडे अशी लढत होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव मोघेंना दारुण पराभव स्विकारावा लागला. यामुळेच कदाचित मोघे मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी पुत्र जितेंद्र मोघेंना घेवून नव्या जोमाने सक्रीय झालेत. मतदार या सगळ्याकडे कसं पाहतात आणि काय कौल देतात याचीच परीक्षा घेणारी ही आगामी निवडणूक असेल यात शंका नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.