ऑडिट विधानसभा मतदारसंघ - येवला, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील पूर्वेला दर्जेदार पैठणीसाठी प्रसिध्द असलेला येवला तालुका. राजकीय आणि विकसनशीलल्दृष्ट्या मागासलेला हा तालुका प्रकाश झोतात  आला, तो 2004 मध्ये भुजबळांच्या उमेदवारीमुळे.  महाराष्ट्रातल्या हेवीवेट मतदारसंघापैकी एक येवला.

Updated: Oct 2, 2014, 11:36 AM IST
ऑडिट विधानसभा मतदारसंघ -  येवला, नाशिक  title=

नाशिक : जिल्ह्यातील पूर्वेला दर्जेदार पैठणीसाठी प्रसिध्द असलेला येवला तालुका. राजकीय आणि विकसनशीलल्दृष्ट्या मागासलेला हा तालुका प्रकाश झोतात  आला, तो 2004 मध्ये भुजबळांच्या उमेदवारीमुळे.  महाराष्ट्रातल्या हेवीवेट मतदारसंघापैकी एक येवला.

येवला येथे सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे इथला सर्वसामान्य माणूस भरडला जातो. या मतदारसंघाची राजकियदृष्ट्या ओळख आहे ती छगन भुजबळांचा मतदारसंघ म्हणून. मुंबईत राहून राजकारण खेळणाऱ्या छगन भुजबळांचा २००४ मध्ये सुरक्षित मतदारसंघाचा शोध याच येवला तालुक्यात येवून थांबला आणि तेव्हापासून आतापर्यंत  सलग दहा वर्ष भुजबळ येवल्याच प्रतिनिधित्व करतायेत. 

२००९ च्या निव़डणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांना एक लाख सहा हजार चारशे सोळा  एवढी मत मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या माणिकराव शिंदे यांना ५६ हजार २३६ मते मिळाली. भुजबळांनी ५० हजार १८० मताधिक्याने विजयश्री मिळवली. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या भारती पवार यांना ४९ हजार ८८९ एवढी मते मिळाली. तर भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांना १ लाख २ हजार ९०२ मतं मिळाली. म्हणजेच भुजबळांच्या बालेकिल्ल्यात ५३ हजारांची आघाडी महायुतीला मिळाली.

गेल्या काही वर्षात भुजबळांनी येवल्याबरोबर संपूर्ण नाशिकच्या विकासासाठी जाणीवपूर्वक चालवलेले प्रयत्न सहज लक्षात येतात. नाशिक- येवला चौपदरी रस्ता झाला, येवला  पैठणी क्लस्टर  करण्याची  घोषणा करण्यात आली. नाट्यगृह, चिल्ड्रन्स पार्क,  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभारण्याचे निश्यित जाले. या विकासकामांमुळे नाशिककरांच्या दरडोई उत्पन्नात वाढ केल्याचा दावा छगन भुजबळ करतात. 
 
भुजबळ विकासाचा दावा करत असले तरी मतदारसंघातील नागरिक समस्यांचा पाढा वाचून दाखवताहेत.  आश्वासन देऊनही पाण्य़ाचा प्रश्न प्रलंबित आहे. टोलेजंगी इमारती वाढल्या पण नागरी विकास खुंटला आहे. कालव्यांचा प्रश्नही रखडला आहे. युवकांना रोजगार नाही तसेच कुठलाही मोठा प्रोजेक्ट नाही त्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे.
 
लोकसभा निकालानंतर विरोधकही आता आमदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायंत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांचा येवला विधानसभा तर त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा नांदगाव विधानसभा मतदारसंघ येतो. मात्र दोन्ही ठिकाणी मतदारांनी भुजबळांच्या पक्षाला साफ नाकारलंय. भुजबळासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.  

गेल्या काही दिवसात अनेक भुजबळ समर्थकांनी महायुतीकडे पावलं वळवली आहेत. त्यामुळे आघाडीविरुद्ध जनमत आणि त्यात विरोधकांचा वाढलेला उत्साह या दोन्ही पातळ्यांवर लढताना भुजबळांना आपला बालेकिल्ला सांभाळताना विशेष प्रयत्न करावे लागतील यात शंका नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.