ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - शिवाजीनगर

पुणे शहरातला सध्याचा सर्वाधिक बहुचर्चित विधानसभा मतदारसंघ... अर्थात शिवाजीनगर... 

Updated: Oct 7, 2014, 09:37 PM IST
 title=

पुणे : पुणे शहरातला सध्याचा सर्वाधिक बहुचर्चित विधानसभा मतदारसंघ... अर्थात शिवाजीनगर... 

विधानसभा निवडणूक 2014 उमेदवार... 
शिवसेना - मिलिंद एकबोटे
भाजप - विजय काळे
काँग्रेस - विनायक निम्हण
राष्ट्रवादी -  अनिल भोसले
मनसे - राजू पवार

२००९ मध्ये झालेल्या मतदार संघ पुनर्रचनेनंतरही अस्तित्व कायम राहिलेला मतदारसंघ म्हणजे पुण्यातला शिवाजीनगर मतदारसंघ. अर्थात सीमा बदलल्यामुळे या मतदार संघाचं स्वरूप आणि राजकारण तेव्हापासूनच बदललेलं आहे. कित्येक निवडणुका युतीचा बालेकिल्ला राहिलेल्या शिवाजीनगरमधील राजकीय गणितं अलीकडच्या काळात बदलली आहेत. 

आणीबाणी नंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळच्या जनता दलाचे शांती नाईक विजयी झाले होते. त्यानंतर भाजपचे आण्णा जोशी सलग २ वेळा, तर भाजप सेना युती झाल्यानंतर शिवसेनेचे शशिकांत सुतार इथे आमदार झाले. त्यानंतर शिवसेनेच्या विनायक निम्हण यांनी १९९९ आणि २००४ मध्ये विजय मिळवून बालेकिल्ला शाबूत ठेवला. 

२००८ मध्ये मात्र विनायक निम्हण नारायण राणे यांच्या सोबत काँग्रेसवासी झाले आणि २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले. दरम्यान, युतीमध्ये हा मतदार संघ भाजपकडे गेला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत निम्हण यांनी भाजपच्या विकास मठकरी यांचा २० हजारपेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला. मतदार संघाच्या विकासासाठी मागील साडेचार वर्षात ३३ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा ते करतात.

विधानसभेत साडेतीनशेहून अधिक लक्षवेधी, औंध हॉस्पिटल, खडकी हॉकी स्टेडीअमचे आधुनिकीकरण, पाण्याची टाकी, समाजमंदिर, व्यायामशाळेची उभारणी, पोलीस वसाहतीमध्ये स्वच्छतागृहांची उभारणी ही सगळी कामं आपणच मार्गी लावल्याचं विनायक निम्हण सांगतात. 

मतदार संघातील विरोधक मात्र विनायक निम्हनांच्या निष्क्रियतेचा पाढा वाचून दाखवतात. मतदारसंघातील अनेक कामे वर्षानुवर्ष प्रलंबित, मतदारसंघात राजकीय दहशत, युवकांना रोजगार नाही अशा अनेक समस्या असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. पण, विजयाची हॅटट्रिक केलेल्या निम्हण यांनी आता चौथ्यांदा आमदार होण्याची जोरदार तयारी चालवलीय.   

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अनिल शिरोळेना याठिकाणी तब्बल ३८ हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे यावेळचं चित्र काहीसं वेगळं राहिल, असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय. 

एकूणच शिवाजीनगरमध्ये यंदाचा निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच रंगणार याची चिन्ह आता दिसू लागलीयत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.