चांदूरजवळ १२ वाहनांचा विचित्र अपघात, एकाच कुटुंबातले तीन जण ठार

जिल्ह्यातल्या चांदूरजवळ अनियंत्रित झालेल्या ट्रकनं, १२ वाहनांना जोरदार धडक दिली. यात एकाच कुटुंबातले तीन जण ठार झाले, तर सुमारे 25 जण जखमी झाले.

Updated: Jul 21, 2016, 07:59 AM IST
चांदूरजवळ १२ वाहनांचा विचित्र अपघात,  एकाच कुटुंबातले तीन जण ठार title=

अमरावती : जिल्ह्यातल्या चांदूरजवळ अनियंत्रित झालेल्या ट्रकनं, १२ वाहनांना जोरदार धडक दिली. यात एकाच कुटुंबातले तीन जण ठार झाले, तर सुमारे 25 जण जखमी झाले.

चांदूरबाजार ते खरवाडी दरम्यानच्या मार्गावर बुधवारी संध्याकाळची ही दुर्घटना आहे. या ट्रकमधून बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक केली जात होती. पहिल्यांदा ट्रकने कारला जोरदार धडक दिली. नंतर समोरुन येणाऱ्या एसटीलाही ट्रक धडकला. पुढे ट्रक तब्बल नऊ दुचाकींना धडक देत, अमरावतीच्या दिशेनं निघून गेला.

दरम्यान अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच दाखल झालेल्या पोलिसांनी जमावाला पांगवलं. तरीही संतप्त जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरता, चांदूरबाजार, ब्राम्हणवाडा थडी, कसबा इथून पोलीस तुकड्या बोलावण्यात आल्या. तर राज्य राखीव दलाची तुकडीही घटनास्थळी दाखल झाली.