पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज वर्ष पूर्ण होतं आहे. आज डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा पहिला स्मृतिदिन. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा रौप्य महोत्सव साजरा होत असताना, त्या कार्यक्रमात डॉ नरेंद्र दाभोलकर नसणं खरोखरच वेदनादायी आहे.
डॉ. दाभोलकर गेल्यानंतरच्या प्रत्येक क्षणात असंख्य भावनिक आंदोलनं दडली आहेत. त्यामध्ये दु:ख आणि वेदना तर आहेच. पण सगळ्यात जास्त आहे तो उद्वेग.
२० ऑगस्ट २०१३ याच दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात हत्या झाली. बालगंधर्व रंगमंदिर ते ओंकारेश्वर मंदिराला जोडणा-या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी- सकाळी डॉक्टरांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या.
या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना, डॉक्टर दाभोलकरांच्या खुनाचं दु:ख आणि गूढ दोन्ही कायम आहे. डॉक्टर दाभोलकरांना मारल्यानं त्यांचा विचार मरणार नाही.
विवेकाचा आवाज बुलंद करत डॉक्टरांचा वारसा नेटाने पुढं नेण्याचं काम आजही अव्य़ाहत सुरु आहे, असं असलं तरी डॉ दाभोलकर आज आपल्यात नाहीत, ही बोचरी सल कायम राहणार आहे.
डॉ दाभोलकरांची हत्या झाली, पोलीस तपास सुरु झाला. शेकडोंची चौकशी झाली, काहींना अटक झाली. पुढे अटक केलेल्यांनाही सोडून देण्याची नामुष्की आली. तपास सीबीआयकडे गेला, त्यालाही आता ३ महिने उलटलेत. एकूणच काय तर वर्ष झालं तरी दाभोलकरांचे मारेकरी अजून मोकाटच आहेत.
दरम्यानच्या काळात २ गोष्टी चांगल्या झाल्या. एक म्हणजे पुण्यात सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली. डॉक्टरांना वाचवू शकलो नसलो तरी भविष्यात त्याचा उपयोग होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे दोन- राज्यात जादूटोणा विरोधी कायद्याला मंजुरी मिळाली. डॉक्टरांनी १८ वर्षं दिलेल्या अविरत लढ्याचं हे यश आहे.
डॉक्टर दाभोलकर आपल्यात नाहीत, हे सत्य पचवणं आजही अवघड आहे.. पण नरेंद्र दाभोलकर सुरु केलेला लढा पुढे नेटानं सुरू ठेवणं ही आजच्या घडीची सगळ्यात मोठी गरज आहे. अंधश्रद्धांचं निर्मूलन होऊन, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित विवेकाधिष्ठित समाज आपल्याला उभा करायचाय. त्यासाठी संघर्ष अटळ आहे.
अंनिसचा रौप्य महोत्सव साजरा होत असताना डॉक्टर दाभोलकरांना त्यांच्या स्मृतीदिनी हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.