औरंगाबाद शिवसेनेत चाललंय तरी काय? कदम-खैरे शाब्दिक संघर्ष

औरंगाबादमधल्या राजकारणात सध्या खासदार चंद्रकांत खैरै आणि पालकमंत्री रामदास कदम यांचातला शाब्दिक संघर्ष सध्या चर्चेचा विषय ठरलाय. कार्यक्रम कुठलाही असो रामदासभाई थेट खैरेंवरच प्रहार करताहेत. रविवारी मुक्ती संग्राम स्मारक उदघाटन कार्यक्रमातही, त्याचीच प्रचिती आली. त्यामुळं शिवसेनेत नेमकं चाललय काय असा प्रश्न निर्माण झालाय. 

Updated: Feb 9, 2015, 06:58 PM IST
औरंगाबाद शिवसेनेत चाललंय तरी काय? कदम-खैरे शाब्दिक संघर्ष title=

औरंगाबाद: औरंगाबादमधल्या राजकारणात सध्या खासदार चंद्रकांत खैरै आणि पालकमंत्री रामदास कदम यांचातला शाब्दिक संघर्ष सध्या चर्चेचा विषय ठरलाय. कार्यक्रम कुठलाही असो रामदासभाई थेट खैरेंवरच प्रहार करताहेत. रविवारी मुक्ती संग्राम स्मारक उदघाटन कार्यक्रमातही, त्याचीच प्रचिती आली. त्यामुळं शिवसेनेत नेमकं चाललय काय असा प्रश्न निर्माण झालाय. 

 गेली कित्येत वर्षं औरंगाबाद शहरावर चंद्रकांत खैरेंच्या रुपात शिवसेनेचंच वर्चस्व आहे. त्यांच्या अधिपत्याला सुरुंग लावण्यासाठीच की काय, रामदास कदम यांना औरंगाबादचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. रामदासभाई आल्यावर शिवसेना आणखी मजबूत होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र प्रत्यक्षात रामदासभाईंनी खैरेंचेच पंख कापण्याचा सपाटा लावलाय की काय असा प्रश्न पडतोय. पक्ष बैठक असो की जिल्हा नियोजन आणि विकास बैठक, रामदास कदम खैरेंची कोंडीच करताना दिसताहेत. रविवारी मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारक उद्धाटन प्रसंगी पुन्हा त्याचाच प्रत्यय आला. 'मी नसतो तर हे काम अजून चार वर्ष झालेच नसते', असं कदम म्हणालेत.

रामदास कदम यांच्या या विधानानंतर कदाचित याचबाबत खैरे मंचावर उपस्थित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे काही सांगायला गेले असता, रामदास कदम भाषण थांबवून खैरेंना काय म्हणाले,"खैरै साहेब मी उद्घव साहेबांना काही तरी सांगतोय,  माझ्या आणि उद्धव ठाकरेंच्या मध्ये येवू नका".

हे कमी म्हणून की काय पुन्हा काही वेळानंतर स्मारकाच्या बांधकामाचं श्रेय तुम्ही घेऊ नका हे उद्धवजींचं श्रेय आहे असा टोला लगावायलाही रामदास कदम विसरले नाहीत. 

या प्रकारामुळे खैरै चांगलेच व्यथित झालेले दिसले. म्हणूनच की काय स्वतः उद्धव ठाकरेंना पुढाकार घेत, या प्रकरणावर सावरासावर करावी लागली. उद्धव ठाकरे म्हणाले, रामदास भाई खैरैंना जे म्हणाले ती आमच्या कुटुंबातील मौजमजा आहे, नाहीतर तुम्ही वेगळा अर्थ घ्याल. 

उद्धव ठाकरेंनी सांभाळून घेतलं असलं तरी हे वाकयुद्ध गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरुच आहे. कारण आदित्य ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यातही रामदास कदमांनी खैरेंना असंच सुनावलं होतं. त्यामुळं महापालिका निवडणुकांपूर्वी पक्षात खैरेंचं महत्व कमी करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.