'बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशाच वागता'

सततच्या छेडछाडीला कंटाळून औरंगाबादेत श्रुती कुलकर्णी या तरुणीनं आपली जीवनयात्रा संपवलीय. पण या प्रकरणात आता नवा खुलासा होतोय. या प्रकरणी श्रुतीनं पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती... पण, पोलिसांचं योग्य सहकार्य तर मिळालं नाहीच शिवाय श्रुतीलाच त्यांनी 'या सर्व प्रकरणाला तूच जबाबदार आहेस... तू तशीच आहेस, बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशाच वागता' असं म्हणत तिची हेटाळणी केल्याचं तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांची भूमिकाही वादग्रस्त ठरतेय. 

Updated: Aug 20, 2015, 10:37 PM IST
'बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशाच वागता' title=

औरंगाबाद : सततच्या छेडछाडीला कंटाळून औरंगाबादेत श्रुती कुलकर्णी या तरुणीनं आपली जीवनयात्रा संपवलीय. पण या प्रकरणात आता नवा खुलासा होतोय. या प्रकरणी श्रुतीनं पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती... पण, पोलिसांचं योग्य सहकार्य तर मिळालं नाहीच शिवाय श्रुतीलाच त्यांनी 'या सर्व प्रकरणाला तूच जबाबदार आहेस... तू तशीच आहेस, बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशाच वागता' असं म्हणत तिची हेटाळणी केल्याचं तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांची भूमिकाही वादग्रस्त ठरतेय. 

श्रुतीचे शेवटचे शब्द... (श्रुतीचं पत्र)

आई, मला माफ कर... 

माझ्या चुकीमुळे तुला आणि सगळ्यांनाच खूप त्रास झाला...

सॉरी... मला असं करायचं नव्हतं गं...

पण खरं सांगते आई, त्या स्वप्नीलनं माझ्यासमोर काही ऑप्शनच ठेवला नाही...

मला तुझं नाव खूप मोठं करायचं होतं गं... 
 
हे पत्र लिहिणारी श्रुती कुलकर्णी आता या जगात नाही. सततच्या छेडछाडीला कंटाळून 21 वर्षांच्या श्रुतीनं आत्महत्या केलीय. स्वप्नील मणियार नावाचा तरुण कॉलेजमध्ये श्रुतीसोबत होता. याच स्वप्नीलनं तिची स्वप्नंच नव्हे, तर तिचं आयुष्यच उद्धवस्त केलं. श्रुतीनं कॉलेज बदललं तरी स्वप्नीलचा त्रास काही संपला नाही. काही दिवसांपूर्वीच स्वप्नीलच्या विरोधात धमकीची तक्रार सिडको पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला 3 ऑगस्टला अटक केली. पण लगेच त्याची जामिनावर सुटका झाली. जामिनावर सुटताच त्यानं पुन्हा श्रुतीला त्रास द्यायला सुरुवात केली. लग्नासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला... पोलिसांनीही ऐकून घ्यायला नकार दिला... या जाचाला कंटाळूनच श्रुतीनं टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप मुलीचे मामा संजय वैद्य यांनी केलाय. 

पोलिसांनी सहकार्य केलं नसल्यामुळेच आपली बहीण जीवाला मुकल्याचा आरोप श्रुतीची बहिण श्रद्धा कुलकर्णी हिनं केलाय. तर, पोलिसांनी मात्र सुसाईड नोटचा हवाला देत हात वर केलेत. 

महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत. असे ढोल सरकार बडवतं... पण राज्यात खरंच मुली आणि महिला सुरक्षित आहेत का? श्रुतीच्या आत्महत्येनं पोलिसांच्या कार्यक्षमेतवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.