अमरावती : युती-आघाडीच्या भानगडीत पडू नका, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ते येथील प्रमुख पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.
नगरपालिका निवडणुकीत 50 टक्क्यांहून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष त्यांनी बोलून दाखवले आहे. या बैठकीपासून प्रसिद्धी माध्यमांना दूर ठेवण्यात आले होते. मेळावा संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही माध्यमांशी बोलणे टाळले. या बैठकीनंतर पांडुरंग फुंडकरांनीही युतीबाबत अधिक बोलणं टाळले.
दरम्यान, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपवर विश्वास ठेवणं कठीण असल्याचा सूर मातोश्रीवर झालेल्या शिवेसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्याचप्रमाणे या निवडणूका स्वबळावर लढण्याचीही सर्वांची भावना उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त करण्यात आलीय.
उद्धव ठाकरेंचाही या भूमिकेला पाठिंबा असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय... याआधी भाजपसोबत लढून काय मिळालं? जयललिता,लालूप्रसाद, ममता बॅनर्जी भाजपशिवाय लढून सत्ता मिळवतात, मग शिवसेना का मिळवू शकणार नाही असंही या बैठकीत उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
तर दुसरीकडे एकीकडे शिवसेना नेते आक्रमक झाल्याची चर्चा असतानाच भाजपानं मात्र आता सबुरीची भाषा केली. शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी याबाबत जिल्हास्तरावर निर्णय होतो. मात्र मुंबईमध्ये युती व्हावी ही भाजपाची इच्छा असल्याचं अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.