छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न, शाळेनं केलं दुर्लक्ष

छेडछाडीला कंटाळून एका 15 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. औरंगाबदच्या देवगिरी कन्या विद्यालयात ही मुलगी शिकत होती. 

Updated: Jan 6, 2017, 09:09 AM IST
छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न, शाळेनं केलं दुर्लक्ष title=

विशाल करोळे, औरंगाबाद : छेडछाडीला कंटाळून एका 15 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. औरंगाबदच्या देवगिरी कन्या विद्यालयात ही मुलगी शिकत होती. 

शाळेबाहेरील एक मुलगा सारखा पीडित मुलीला त्रास देत होता. याबाबत तिनं शाळेच्या शिक्षकांनाही माहिती दिली होती, असं तिचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर पोलिसांनाही याबाबतची माहिती दिल्याचा दावा तिनं केलाय. मात्र कुणीच याकडं लक्ष न दिल्याने अखेर या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

मात्र, घरी असलेल्या तिच्या आईनं हा प्रकार पाहिला... आणि पुढचा अनर्थ टळला. आता शाळा आणि त्या मुलावर कारवाईची मागणी मुलीच्या आईने केलीय.

याबाबत शाळेने असा प्रकार घडलाच नसल्याचं म्हटलंय. तसंच पीडित मुलीच्या आईला बोलावून 'तिला सांभाळा' असं सांगितल्याचा दावाही देवगिरी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका लता गुंजाळ यांनी केलाय. शिवाय कन्याशाळा असल्याने आजूबाजूच्या परिसरातील मुलं विद्यार्थिनींना त्रास देत असल्याची हतबलताही शाळेने व्यक्त केलीय. 

आता या प्रकरणी पोलिसांनी छेडछाडीचा गुन्हा दाखल करून त्रास देणाऱ्या मुलाचाही शोध सुरु केलाय. मात्र मुलीनं वारंवार तक्रार करूनही शाळा प्रशासन तसंच पोलिसांनी दुर्लक्ष केलं असेल आणि यात या विद्यार्थिनीचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय.