बालकाच्या साक्षीने वडिलांनी आईची हत्या केल्याचे उघड

वर वर वाटणारी आत्महत्येची घटना खून असल्याचं निष्पन्न झाले आहे. तेही एका बालकाच्या साक्षीनं. होय औरंगाबादेत हा प्रकार उघड झालाय.

Updated: Jun 3, 2016, 07:28 PM IST
बालकाच्या साक्षीने वडिलांनी आईची हत्या केल्याचे उघड title=

औरंगाबाद : वर वर वाटणारी आत्महत्येची घटना खून असल्याचं निष्पन्न झाले आहे. तेही एका बालकाच्या साक्षीनं. होय औरंगाबादेत हा प्रकार उघड झालाय.

औरंगाबादच्या शंभूनगर भागात चार दिवसांपूर्वी एका विवाहितेनं आत्महत्या केल्याचं प्रकरण पुढं आलं होतं. तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून या महिलेनं आत्महत्या केल्याचं तिच्या नवऱ्यानं सांगितलं होतं. पोलिसांनी त्या दिशेनं तपासही सुरु केला. मात्र तपासात वेगळचं सत्य समोर आलंय. 

हे सत्य सांगितलं त्या महिलेच्या लहानग्या मुलाने. राजेंद्र पैठणे आणि किरण यांच्यात चार दिवसांपूर्वी तुंबळ भांडण झालं. राजेंद्रनं किरणला मारहाण केली आणि आत्महत्या करत असल्याचं पत्र लिही असं सांगितलं. किरणनं ऐकलं नाही म्हणून राजेंद्रनं मुलांनाही मारहाण सुरु केली अखेर किरणनं आत्महत्या करत असल्याचं पत्र दिलं. 

त्यानंतर राजेंद्रने मुलांना बाजूच्या रुममध्ये नेलं आणि किरणला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिलं आणि त्यानंतर जणू तिनं आत्महत्याच केली या अविर्भावात वागायला लागला. मात्र हा सगळा प्रकार मुलांनी पाहिला होता. पोलिसांनी चौकशीत मुलांचा इनकॅमेरा जवाब घेतला आणि मुलानं सांगितलेल्या माहितीनं बापाचं पितळ उघडं पडलं.

किरणला तीन अपत्य होती. मात्र नवरा बायकोचा सतत छळ करत असल्याचा मुलीच्या पालकांचा आरोप होता. त्यातून राजेंद्रला आत्महत्येत प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र आता खूनाच्या आरोपाखाली त्याच्यावर चार्जशीट दाखल करण्यात येणार आहे.  

पोलिसांनी हा सगळा प्रकार उघड केला असला तरी आता या तीन लहानग्यांना सांभाळायला कोणीही तयार नाही.  या दामप्त्याला ११ आणि ९ वर्षांची २ मुलं आणि १३ महिन्यांनी मुलगी आहे. दारूड्या बापामुळे आई गेली. खूनामुळे बापही जेलमध्ये. आता या मुलांचं कसं होणार या विचारानं हळहळ व्यक्त होतेय.