मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीमधून नेत्यांचं आऊटगोईंग सुरू झालंय, तर शिवसेना-भाजपामध्ये फ्री इनकमिंग सुरूय… काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बुडत्या जहाजातून अनेक नेत्यांनी उड्या मारायला सुरुवात केल्यानं आघाडीत अस्वस्थता आहे, याउलट महायुतीला मात्र आनंदाचं भरतं आलंय.
राजकारणात अनेकांचा उद्देश सत्ता उपभोगणं हा असतो. त्यामुळं सत्ताधारी पक्षात प्रवेशासाठी झुंबड उडालेली असते. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत अनेक नेत्यांनी प्रवेश केला. यात प्रामुख्याने नारायण राणे यांच्यासह दहा आमदार, भास्कर जाधव यासारख्या बड्या नेत्यांची नावे घेता येतील. मात्र आता हे चित्र बदललंय...
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतर पक्षातून सुरू असलेलं इनकमिंग थांबलं आणि आघाडीतूनच आऊटगोंईग सुरू झालं. कारण लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर, आता काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही असं बोललं जातंय. शिवसेना-भाजपच सत्तेवर येणार, असा राजकीय अंदाज आहे. त्यामुळं महायुतीमध्ये फ्री इनकमिंग जोरात सुरूय... यात प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे.
सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप, माजी आमदार अनिल बाबर, पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी शिवसेना-भाजपाची वाट धरलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकरही भाजपाच्या वाटेवर आहेत. सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांनी २५ नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आणि सुशीलकुमार शिंदे यांचे सुरुवातीपासूनचे अनुयायी विष्णुपंत कोठे यांना काँग्रेसने योग्य संधी न दिल्यानं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून ते प्रणीती शिंदे यांच्याविरोधातच रिंगणात उतरणार आहेत.
गेल्या वेळी पश्चिम महाराष्ट्रातून आघाडीचे ३७ पैकी २५ आमदार विजयी झाले होते. आता, या गडालाच शिवसेना-भाजपनं खिंडार पाडण्याची तयारी सुरू केलीय. याशिवाय ठाण्यातून काँग्रेसचे नेते रवींद्र फाटक यांनी काही नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. नांदेडमधून राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रताप पाटील-चिखलीकर आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील यांनीही मातोश्रीच्या दरवाजातून शिवसेनेत एन्ट्री घेतलीय.
सत्तेचं लोणी चाखायला अनेक जण राजकारण करतात. त्यामुळेच जिकडे सत्ता तिकडे आम्ही असे उड्या मारणारे अनेक नेते राज्याच्या राजकारणात आहेत. सत्तेची समीकरणं बदलू लागली की अशा नेत्यांच्या निष्ठाही बदलतात. त्यामुळेच अनेक जणांसाठी पक्षनिष्ठेपेक्षा सत्ता निष्ठाच महत्त्वाची असते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हेच चित्र राज्यात पहायला मिळत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.