कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं आणि भाजपनं १२० जागांवर, तर मनसेनं ८८, काँग्रेसनं ५६, राष्ट्रवादीनं ४५ आणि एमआयएमनं ७ जागांवर उमेदवार उभे केलेत. विशेष म्हणजे ऐनवेळी २७ गावांतल्या संघर्ष समितीनंही १८ उमेदवार रिंगणात उतरवल्यानं निवडणुकीतली चुरस वाढलीय.
पितृपक्ष संपला आणि शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. अगदी राजकीय पक्षांना देखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करायला मुहूर्त सापडला नाही. बंडखोरी टाळण्यासाठी मध्यरात्रीच्या अंधारातच अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं... त्यानंतर उर्वरित कागदपत्रांची पूर्तता करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा अपवाद वगळता बाकीचे सर्व पक्ष स्वबळावरच निवडणूक लढवतायत. खरं तर २७ गावांतल्या संघर्ष समितीनं या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. मात्र शिवसेनेनं ऐनवेळी २७ गावातल्या २१ प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं संघर्ष समितीलाही ऐनवेळी उमेदवार रिंगणात उतरवावे लागले. यावेळी शिवसेना आणि संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हंगामा झाला. घोषणाबाजी आणि बाचाबाचीही रंगली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळं वाद निवळला.
दरम्यान, २७ गावांपैकी मनेरी वसार आणि भोपर संदपमध्ये एकाही उमेदवारानं अर्ज भरलेला नाही. त्यामुळं तिथं पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागेल. तर आशेरे चिंचपाडामध्ये एकच अर्ज आल्यानं त्या उमेदवाराची बिनविरोध निवड होणार आहे. उर्वरित महापालिका वॉर्डांमध्ये बहुरंगी लढती रंगणार आहेत... परिणामी ही निवडणूक चांगलीच चुरशीची होईल, अशी चिन्हं आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.