बालिका अत्याचार प्रकरणानंतर नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता, इंटरनेट सेवा बंद

कथित बालिका अत्याचार प्रकरणानंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. पहिल्यांदाच शहरात गेल्या चार दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद आहे. 

Updated: Oct 13, 2016, 11:28 PM IST
बालिका अत्याचार प्रकरणानंतर नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता, इंटरनेट सेवा बंद title=

नाशिक : कथित बालिका अत्याचार प्रकरणानंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. पहिल्यांदाच शहरात गेल्या चार दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद आहे. 

सोशल मीडियावरील अफवा आणि भडक फोटो यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आत्तापर्यंत पाच लोकांना याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. 

गेल्या तीन ते चार दिवसांत एसटी महामंडळाच्या बसेसना लक्ष कऱण्यात आल्याने बससेवा काही काळ बंद करण्यात आली होती. त्यामुळे कोट्यवधी रूपयांचा फटका महामंडळाला बसलाय. हजारो प्रवाशांची गैरसोय झालीय. 

नाशिक जिल्ह्यातील तळेगावमध्ये घडलेल्या बालिका अत्याचारानंतर संपूर्ण जिल्ह्यात आगडोंब उसळला. संतप्त जमाव रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करू लागला. वाहनांची तोडफोड, टाय़र जाळपोळ यासह ग्रामीण भागातील प्रवाशांची वाहतूक करणारी एसटी बस लक्ष करण्यात आली. 

10 ते 12 बसेसची जाळपोळ आणि तितक्याच बसेसची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे रविवारपासून नाशिक जिल्ह्यातील बस वाहतूक बंद करण्यात आली होती. मुंबई, पुण्यासह इतर शहरात आणि ग्रामीण भागात जाणा-या प्रवाशांचे यामुळे हाल होत आहेत. शहर वाहतूक बससेवाही काही काळ बंद ठेवण्यात आली होती. 

नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, निफाड, देवळा, सटाणा, नांदगाव या तालुक्यांना आंदोलनाची झळ पोहोचलीय. त्यामुळे या तालुक्यातील काही गावांचं जनजीवन विस्कळीत झालंय. त्यामुळे परिस्थिती बघून काही मार्गांवरची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आलीय.. गेल्या चार दिवसांत लाखो रूपयांचं नुकसान झालंच आहे पण कोट्यवधींचा महसूलही बुडालाय. 

पोलिसांन संचलन करून समाजकंटकांवर कारवाईला सुरूवात केलीय. संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवून काही भागात संचारबंदीही लागू करण्यात आलीय. पुढील दोन दिवस इंटरनेट सेवाही बंद ठेवणयात येणार आहे.