नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या या प्रचारात रंग चढत असताना धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा प्रचार पाहून तुम्हालाही वाटेल कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र.
अबीर गुलाल फासलेले तांदूळ, मटकी, डाळ. मतदारांच्या घरासमोरही या वस्तू टाकल्याचं पाहायला मिळतायेत. हा प्रकार आहे नवी मुंबईतल्या एका सोसायटीतील. महापालिका निवडणुकांच्या प्रचारात अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेचा प्रकार उघड झालाय.
प्रभाग क्रमांक ८४च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार स्नेहा पालकर यांनी प्रचार फेरी दरम्यान मतदारांवर दबाव टाकण्यासाठी हा अघोरी मार्ग अवलंबल्याचा आरोप शिवसेनेकडून होतोय.
राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते कशाप्रकारे अंधश्रद्धेचा आधार घेतायत याचं मोबाईल चित्रीकरण केल्याचा दावाही शिवसेना उमेदवार रंगनाथ औटी यांनी केलाय.
मतदारांना हा घाबरवण्याचा प्रकार असून याबाबत निवडणूक आयोग आणि पोलिसांत तक्रार करणार असल्याचं औटी यांनी सांगितलंय. दुसरीकडे हा आपल्याला बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या उमेदवार स्नेहा पालकर यांनी केलाय.
या सा-या प्रकारामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.. जनतेची सेवा करुन मताचा जोगवा मागितला जातो.. मात्र निवडणुकीच्या प्रचारात अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेचा वापर होणं ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.