पुण्याच्या महापालिकेत ९७ नव्या चेहऱ्यांना संधी

यंदा पुणे महापालिकेत तब्बल ९७ नवीन चेहरे असणार आहेत. तर १०० पैकी ५५ जणांना पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून संधी मिळालीय. 

Updated: Feb 25, 2017, 07:27 PM IST
पुण्याच्या महापालिकेत ९७ नव्या चेहऱ्यांना संधी title=

पुणे : यंदा पुणे महापालिकेत तब्बल ९७ नवीन चेहरे असणार आहेत. तर १०० पैकी ५५ जणांना पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून संधी मिळालीय. 

पुणे महापालिकेची यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. ४१ प्रभागांत मिळून निवडून आलेल्या १६२ पैकी ९७ उमेदवार पहिल्यांदाच महापालिका सभागृहात समावेश करणार आहेत. १० नगरसेवकांना एका ब्रेक नंतर पुन्हा संधी मिळालीय. तर सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणारे ५५ उमेदवार सभागृहामध्ये अनुभवी नगरसेवक म्हणून मिरवणार आहेत. 

या सगळ्यांमध्ये काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आबा बागुल यांना मिळालेला विजय लक्षवेधी ठरलाय. बागुल सलग सहाव्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेत. आबा बागुल १९९२ पासून सभागृहात आहेत. उपमहापौर, पक्षनेता, स्थायी समिती अध्यक्ष अशी अनेक पदं त्यांनी भूषवलीय. यावेळी त्यांनी स्वतःची रौप्य महोत्सवी वाटचाल पार केलीय. 

या निवडणुकीत आबा बागुल विजयी झाले असले तरी त्यांच्या पक्षाचं पानिपत झालंय, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आबा बागुल यांच्या खालोखाल भाजपचे सुनील कांबळे आणि बाबुराव कर्णे गुरुजी यांनी सलग पाचव्यांदा निवडून येण्याची कामगिरी केलीय. त्याचप्रमाणे भाजपच्या मुक्ता टिळक यांनी आपली विक्रमी माताधिक्यानं निवडून येण्याची परंपरा कायम राखली. त्या सलग चौथ्यांदा निवडून आल्यात. 

त्याशिवाय तिसऱ्यांदा निवडून आलेले १९ नगरसेवक यावेळच्या सभागृहात असणार आहेत. ९७ नवीन चेहऱ्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक ७१, शिवसेनेचे ५, राष्ट्रवादीचे १६ तर काँग्रेस, मनसे तसेच एमआयएमच्या प्रत्येकी एक नगरसेवकाचा समावेश आहे. - एकूणच यावेळच्या महापालिका सभागृहात नव्या - जुन्यांचा उत्तम मेळ आहे. तो त्यांनी कामकाजातही राखावा हीच अपेक्षा.