कोल्हापूर: महाराष्ट्र दोन विचारवंतांच्या हत्येनं हादरलाय... एक म्हणजे अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि दुसरे कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे... संतापजनक बाब म्हणजे दोन्ही विचारवंतांच्या मारेकऱ्यांना जेरबंद करण्यात पोलीस अपयशी ठरलेत. आज १६ मार्च, गेल्या महिन्यात १६ तारखेलाच कोल्हापूरात कॉमरेड गोविंद पानसरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पानसरेंचा मृत्यू झाला.
अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांये मारेकरी दीड वर्षाहून अधिक काळ उलटला तरी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या प्रकरणात कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत.. राज्यात आघाडी सरकार असताना केवळ तपास सुरु असल्याचं सांगण्यात येत होतं. आता नवं सरकार आल्यानंतर तरी या तपासाला वेग येईल असं बोललं जात होतं. मात्र परिस्थिती जैसे थेच आहे... तर दुसरीकडे कॉम्रेड पानसरे यांच्यावरील हल्ल्याला महिना उलटला.. मात्र मारेकऱ्यांना शोधण्यात पोलीस अपयशी ठरलेत. पोलिसांचा तपास दिशाहीन असल्याचं दिसून येतं.
१६ फेब्रुवारी वेळ सकाळी साडेनउची. ठिकाण कोल्हापूर शहरातील सागरमाळ... नेहमीप्रमाणे कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे नाश्ता घेण्यासाठी बाहेर पडले होते.. तेव्हड्यातच पत्ता विचारण्याचा बाहाण्यानं मोटारसायकलवरुन आलेल्या मारेकऱ्यांनी गोविंदराव पानसरे आणि उमा पानसरे यांच्यावर पिस्तुलमधून पाच राऊंड झाडल्या. तीन गोळ्या गोविंदराव पानसरे यांना लागल्या आणि एक गोळी उमा पानसरे यांच्या डोक्याला घासून गेली. हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला.
गोविंदराव पानसरे हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांच्यावर अस्टर आधार हॉस्पिटलमध्ये तातडीच्या दोन शस्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर गोविंदराव पानसरे यांची प्रकृतीत सुधारणा झाली. उमा पानसरेंवर देखील तातडीनं उपचार झाल्यामुळं त्यांची प्रकृतीही स्थिर झाली. महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून संतापाची लाट उसळली. ज्या गोविंदराव पानसरे यांनी आपलं उभं आयुष्य पुरोगामी वारसा चालविण्यासाठी घालवलं अशा गोविंदराव पानसरेंवर हा भ्याड हल्ला झाल्यानं संताप व्यक्त केला जात होता.
गोविंदराव पानसरे त्यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा खरा चेहरा समाजापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत होते. त्याचबरोबर शमशुद्दीन मुश्रीफ यांचं 'हू किल्ड करकरे' हे पुस्तक अनेकांपर्यत पोहचावं यासाठी अनेक जातीयवादी शक्तींना अंगावर घेवून त्यांनी काम सुरु ठेवलं होतं. रुग्णालयात सुरु असलेल्या उपचाराला पानसरे चांगला प्रतिसाद देत होते, प्रकृतीही सुधारत होती. पण २० फेब्रुवारीला त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना एअर अॅम्ब्युलन्सनं मुंबईच्या ब्रिंज कॅन्डी हॉस्पिटलला हलविण्यात आलं. पण त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता उपचार सुरु असतानाच पानसरे यांचा मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा पुरोगामी महाराष्ट्रावर शोकळा पसरली.
घटनेला आता एक महिना पूर्ण झालाय. पण गोविंदराव पानसरे यांचे मारेकरी अजून पोलिसांना सापडले नाहीत. पानसरे दामपत्त्यावर हल्ला झाल्यानंतर कोल्हापूर पोलीस अधिक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी अतिरिक्त पोलीस अधिक्षक अंकीत गोयल यांच्याकडं तपासाची सगळी सुत्र दिली. घटनेचं गांभीर्य पाहता तापासत क्राईम ब्रॅंच, एटीएसची टीमही सामील झाली. सुरवातीला दहा पथकांच्यामाध्यमातून सुरु असलेला तपास २५ पथकांच्या माध्यमातून सुरु झाला. तरी देखील पोलिसांच्या हाती सहा बेवारस मोटार सायकली व्यक्तीरिक्त काहीही लागलं नाही.
राज्याचे पोलीस महानिरीक्षक संजीव दयाल यांनीही कोल्हापूरात जाऊन तपासाची माहिती घेतली. त्यांनी आम्ही हल्लेखोरांपर्यंत पोहचू असा पोकळ विश्वास व्यक्त केला. पण एक महिना उलटला तरीही पोलीस मारेकऱ्यापर्यंत पोहचले नाहीत, पोलीस कोणत्या दिशेनं तपास करतायेत हेही स्पष्ट झालेलं नाही. एकूणच पोलिसांच्या तपासाबाबत आणि त्याच्या कार्यपद्धताबाबात समाजातील सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जातोय.
२५ पथकांच्या मार्फत पोलिसांचा कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव, बंगळुरू, गोवा, पुण्यामध्ये तपास सुरु आहे. पोलिसांनी आतापर्यंत तपास नेमका कसा केला आणि त्याच्या हाती काय लागलं हे पाहूया..
- पंचवीस टिमच्या माध्यमातुन तपास सुरु आहे.
- कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस, ए.टी.एस. क्राईम ब्रॅंचचे अधिकारी तपास करत आहेत.
- आतापर्यंत सहा बेवारस मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्यात.
- कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगांव इथल्या अट्टल गुन्हेगाराची चौकशी झाली आहे
- कोल्हापूर, सांगली, पुणे, गोवा, बेळगांव, बंगळुरू ही तपासाची केंद्र बिंदू आहेत.
तर या विविध पातळ्यांवर तपास सुरु आहेत.
- वैयक्तिक कारणातून हल्ला झाला आहे का?
- कुटुंबातील वाद आहेत का?
- जागेच्या खरेदी विक्रीतून वाद झाला आहे का?
- गोकुळ आणि के.डी.सी.सी बॅंक प्रकरणातून हल्ला झाला आहे का?
- जातीयवादी शक्तींनी पानसरे यांच्यावर हल्ला केला आहे का? या सगळ्या शक्यतांवर पोलिसांचा तपास सुरु आहे
उमा पानसरे यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे. गोविंदराव पानसरे यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी मी इथून पुढं कार्यरत राहाणार असं सांगत, उमा पानसरेंनी हल्लेखोरांच्या आणि या हल्ल्याच्या सुत्रधारांना चांगलीच चपराख लागावलीय.
अशा भ्याड हल्ल्यांद्वारे महाराष्ट्रातील पुरोगामी विचार पुसण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही. पानसरेंवर झालेल्या हल्ल्यानंतर उभ्या महाराष्ट्रानं याचीच प्रचिती दिली. मात्र आता गरज आहे ती पोलिसांनी गोविंदराव पानसरे यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडण्याची. असं झालं नाही तर राज्यातील जनतेचा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास उडायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.