ठाणे : आज मोखाड्यात ग्रामी़ण विकास तसंच महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा आहे.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले जमावबंदीचे आदेश मागे घेण्यात आलेत. मोखाड्यात कुपोषणामुळे लहान मुलांचे बळी गेलेत. त्याच गावात पंकजा मुंडेचा दौरा आहे.
चार दिवसांपूर्वी या गावात राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा हे कुपोषणाने मृत्युमुखी पडलेला बालक सागर वाघ यांच्यात कुटुंबियांना भेटायला आले होते. मात्र सागरच्या आईने आणि आजीने चक्क सावरा यांना दारातूनच हाकून दिले. सहाशे मुलांचा मृत्यू झाला, तुम्ही आता येत आहात का, असा सवाल ग्रामस्थांनी विचारला तेव्हा 'सहाशे मुलांचा मृत्यू झाला, असू दे की' असं उद्दाम वक्तव्य विष्णू सावरांनी केलं होतं.
त्यामुळे या दौऱ्यात 'श्रमजिवी' संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्यानंतर आज, पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रमजिवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आलीय.
उल्लेखनीय म्हणजे, ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत कुपोषणानं जवळपास १३ मुलांचा मृत्यू झालाय.