खाक्या वर्दीतला माणूस... वृद्धांना मायेचा आधार!

खाकी वर्दीच्या आत एक माणूस लपलेला असतो हेच दाखवून दिलंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण पोलिसांनी...

Updated: Jan 6, 2017, 02:58 PM IST
खाक्या वर्दीतला माणूस... वृद्धांना मायेचा आधार! title=

प्रणव पोळेकर, रत्नागिरी : खाकी वर्दीच्या आत एक माणूस लपलेला असतो हेच दाखवून दिलंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण पोलिसांनी...

चिपळूण तालुक्यातल्या अत्यंत गरीब वृद्धांची आरोग्य तपासणी व्हावी यासाठी, पोलिसांनी शिबिराचं आयोजन केलं. निमित्त होतं ते 'महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे'चं... यासाठी चिपळूण पोलीस आपल्या बीटमधल्या गरीब आणि निराधार वृद्धांना शोधून या शिबिरात घेऊन आले. ज्यांचे कुटुंबिय काही ना काही कारणांनी दूर गेलेत त्या सर्व वृद्धांना रत्नागिरी पोलिसांनी मात्र पोरकं होऊ दिलं नाही. 

एवढ्यावरच न थांबता या वृद्धांना लागणारं बँक अकाऊंट, त्यांचं आधार कार्ड आणि इतरही आवश्यक कागदपत्रांची अगदी चोख व्यवस्था, पोलिसांनी या निमित्तानं करुन दिली. निराधार वृद्धांना आधार मिळावा म्हणून, तब्बल पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या संकल्पनेतून, तब्बल 950 ज्येष्ठ नागरिकांना चिपळूण पोलीस ठाण्यानं दत्तक घेतलं.  

चिपळूण पोलिसांनी माणुसकी जपत या ज्येष्ठ नागरिकांना मायेचा आधार दिलाय. त्यांच्या या उपक्रमाचं सर्वच थरांतून कौतुक होतंय.