कल्याण: सावत्र वडिलांच्या अश्लील चाळ्यांचा पुरावा म्हणून मुलीनंच त्या घृणास्पद कृत्यांची गुप्तपणे व्हिडिओ क्लिप बनवण्याची आणि विश्वास न ठेवणाऱ्या आईला पुरावा दिल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. गेली दोन वर्षे या मुलीचे सावत्र वडील तिच्याशी लैंगिक चाळे करायचे.
नुकतीच अकरावीत गेलेल्या या मुलीला ५८ वर्षांचे तिचे सावत्र वडील टीव्ही बघताना सोफ्यावर बाजुला बसवायचे नी अश्लील चाळे करायचे. त्या मुलीनं अनेकवेळा आईकडे तक्रार केली देखील. परंतु पतीच्या चांगुलपणावर विश्वास असलेल्या आणि त्यानं कानावर हात ठेवल्यानं आईनं मुलीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. परंतु अत्यंत धैर्यवान असलेल्या या मुलीनं दोन वर्षांचा हा त्रास संपवण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला. वडिलांनी नेहमीप्रमाणे दुपारी विश्रांतीसाठी घरी आल्यावर तिच्याशी केलेले चाळे त्याच्या नकळत तिनं रेकॉर्ड केलं.
या रेकॉर्डिंगच तिनं आईला दाखवल्यावर धक्का बसलेल्या आईचा विश्वास बसला आणि तिनं मुलीसह पोलीस ठाणे गाठलं आणि नवऱ्याला अटक करविली. या महिलेचा सात वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून गेली १४ वर्षे परिचयाचा असलेल्या व्यक्तिशी तिनं दुसरं लग्न केलं. ज्या माणसानं मुलीला लहानपणापासून बघितलं आहे तो असं उद्योग करणार नाही असं वाटल्यानं तिनं मुलीवर विश्वास ठेवला नव्हता परंतु व्हिडिओ टेप बघून तिचे डोळे उघडले.
आठ दिवसांपूर्वी कोळसेवाडी पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली आहे. या सावत्र बापाने अत्यंत घाणेरडा अपराध केला असून त्याला जामीन मिळू नये असा आपला प्रयत्न असेल असं या मुलीच्या वकिलांनी सांगितले आहे. पोलिसांनी देखील जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आणि मुलीचं धाडस कौतुकास्पद असल्याचं सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.