योगेश खरे / नाशिक : येथील कारागृहात कैदी मुक्तपणे, अनिर्बंधपणे मोबाईलवर बोलत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कैदी मोबाईलवर बोलत असल्याची दृष्य झी 24 तासच्या हाती लागली आहेत.
नाशिक कारागृहात गजाआड असलेले कैदी मोबाईल फोनच्या माध्यमातून आपल्या टोळ्यांशी संपर्कात आहेत. 2004 पासून नाशिक कारागृहातून 2171 कैदी फरार झालेत. त्यातल्या अनेकांचा शोध अजूनही लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढ आहे. कैद्यांना मोबाईल नेऊन देण्यात काही पोलीस कर्मचारी, काही अधिका-यांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. त्याशिवाय कैद्यांपर्यंत मोबाईल पोहोचणंच शक्य नाही. त्यामुळे या मोठ्या माशांवर काय कारवाई होणार हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून कैदी मोबाईलचा मुक्तपणे वापर करत आहेत. नाशिक शहरातीलच नाही तर गजाआड असलेले राज्यातले कुख्यात गुन्हेगार सऱ्हास मोबाईलच्या माध्यमातून आपल्या टोळ्यांशी संपर्कात आहेत. यामुळे अनेक जण सुनियोजीतपणे फरार झालेत. मोबाईलच्या मुक्त वापराची दृष्ये झी 24 तासच्या हाती लागली आहेत. त्यामुळे है कारागृह आहेत की कैद्यांचं नंदनवन असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
दहशदवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या महाराष्ट्र राज्यातल्या सुरक्षा यंत्रणेची पोलखोल करणारा हा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. नाशिक मध्यवर्ती कारागृहात अनेक गंभीर गुन्ह्यातले कैदी आहेत. त्यांचा त्यांच्या टोळ्यांशी या मोबाईल फोन्सच्या माध्यमातून खुलेआम संपर्क आहे. चार महिन्यांपूर्वी याच कारागृहातून वकील पल्लवी पूरकायस्थ हत्या प्रकरणातला दोषी सज्जाद पठाण पॅरोलच्या रजेवर जाऊन फरार झाला.
या प्रकरणात एका जेलरला निलंबित करण्यात आले. सज्जाद पठाण एकटाच नाही तर या जेलमधून तब्बल 17 आरोपी फरार झालेत. त्यातले बहुतांश जन्मठेप आणि गंभीर गुन्ह्यातले आहेत. नाशिक कारागृहातून आत्तापर्यंत
- 2012 मध्ये 2897 आरोपी रजेवर गेले. त्यातले 198 फरार झाले, त्यातल्या 41 जणांना पकडणं शक्य झालं. 2013 मध्ये 1519 जण रजेवर गेले त्यातले 305 जणं फरार झाले त्यापैकी 66 जणांना पकडता आलं. तर 2014 मध्ये 259 जण रजेवर गेले त्यापैकी 58 फरार झाले तर 43 जणांना पकडणं शक्य झालं. 2014 पासून आत्तापर्यंत नाशिक कारागृहातून 2171 कैदी फरार झालेत.
- हे सर्व घडतंय कारागृहातल्या अनिर्बंध मोबाईल वापरामुळे. कैद्यांना मोबाईल नेऊन देण्याचं काम काही पोलीस कर्मचारी करतायत तर काही अधिकारीही त्यांना मदत करतायत. एवढंच नाही तर अगदी जेलरपासून अनेक अधिकारी पॅरोल कसा मिळवायचा, त्यासाठी बनावट कागदपत्रं कशी मिळवायची याचं मार्गदर्शनही करत आहेत.
- 2014 मध्ये नाशिक कारागृहात मोबाईल सापडण्याच्या 4 घटना घडल्या, त्यातल्या 2 घटनांचा तपास लागला. 2015 मध्ये 6 घटना घडल्या. 2 प्रकरणात तपास होऊन आरोपपत्र दाखल झालं तर 3 प्रकरणांचा तपास सुरू आहे. 2016 मध्ये 7 घटना घडल्या, त्यापैकी 5 घटनांचा तपास लागला. तर 2 घटनांचा तपास लागलेला नाही.
काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून या संभाषणाचं टॅपिंग होऊन अहवाल सादर करण्यात आला. मात्र कारागृह प्रशासनाने कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर ठपका ठेऊन त्यांना निलंबित केले. महानिरिक्षकांच्या कार्यालयापासून ते थेट जेल कर्मचाऱ्यांपर्यंत ही साखळी असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.