पुणे मेट्रो अडकली राजकीय वादात

पुणे मेट्रो आता राजकीय वादात अडकलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यातल्या आरोप - प्रत्यारोपांमुळे मेट्रोची दिशा भरकटलीय.

Updated: Aug 20, 2014, 10:30 AM IST
पुणे मेट्रो अडकली राजकीय वादात

पुणे : पुणे मेट्रो आता राजकीय वादात अडकलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यातल्या आरोप - प्रत्यारोपांमुळे मेट्रोची दिशा भरकटलीय.

मेट्रो हा तसा सर्वसामान्यांच्या जवळचा विषय. आता निवडणुकीचं स्टेशन जवळच असल्यानं राजकीय नेतेही आपापल्या परीनं मेट्रोला गती देण्याच्या प्रयत्नात आहेत. मुख्यमंत्री आणि गडकरी यांच्यात रंगलेला कलगीतुरा हे त्याचंच उदाहरण.. पण मुळात मंत्रिमंडळात मंजुरी मिळण्यासाठी काही अटींची पूर्तता करायला हवी...

मेट्रोला मंजुरी मिळण्यासाठी, मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीसाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना करणं.
मेट्रो बाधित झोनवरच्या हरकती, सूचनांची सुनावणी घेणं 
मेट्रो प्रकल्पासाठी स्वतंत्र अधिकारी नेमणं 
मेट्रो प्रकल्पासाठी निधीची तरतूद करणं 
यासह १० अटींची पूर्तता महापालिका आणि राज्य सरकारनं करणं आवश्यक आहे. 

त्या पूर्ण केल्या तरंच पुण्यातल्या मेट्रोला केंद्राची अंतिम मान्यता मिळणार आहे. मात्र गेल्या १० वर्षांहून यावर फक्त चर्चेचं गु-हाळच सुरू आहे. पुण्यातली मेट्रो अंडर  ग्राऊंड असावी कि एलिव्हेटेड, कंपनीच्या संचालक मंडळावर कुणाची वर्णी लावायची अशा अनेक वादांमुळे पुण्यातली मेट्रो अजूनही कागदावरच अडकलीय.  

पुण्यामध्ये पहिल्या टप्प्यात ३१. ५१ किलोमीटर मार्गावर मेट्रो प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यात, पिंपरी - चिंचवड ते स्वारगेट या १६. ५९ किलोमीटर तसंच वनाज ते रामवाडी या १४. ९२ किलोमीटर मार्गाचा समावेश आहे. 

या प्रकल्पासाठीचा प्रस्तावित खर्च १० हजार १८३ कोटी इतका आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणं अपेक्षित आहे. पण दुर्दैवानं शह कटशहाच्या राजकारणात मेट्रोवरुन आरोप-प्रत्यारोपांचा वेग वाढलाय आणि मेट्रो मात्र अडकलीय. 

सुप्रिया सुळेंची सावध प्रतिक्रिया
पुणे : पुणे मेट्रो वरून मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्यात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतलीय.

मेट्रो च्या मुद्यावर राजकारण होऊ नये अस सांगताना सुळे यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू घेण ही टाळलं आणि त्याच बरोबर गडकरी यांच्यावर टीका करण ही टाळलं. पुण्यातला मेट्रो प्रकल्प होणं गरजेचं असल्याचं सुळे यांनी स्पष्ट केलं. त्या हिंजवडीमध्ये बोलत होत्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.