तीनही मुलीच झाल्या म्हणून... चिमुरड्यांसहीत आईनं संपवलं आयुष्य!

तीनही मुलीच झाल्या म्हणून सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेनं तीन मुलींसहीत स्वत:च आयुष्य संपवल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय.  

Updated: May 26, 2016, 10:06 PM IST
तीनही मुलीच झाल्या म्हणून... चिमुरड्यांसहीत आईनं संपवलं आयुष्य! title=

विशाल करोळे, औरंगाबाद : तीनही मुलीच झाल्या म्हणून सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेनं तीन मुलींसहीत स्वत:च आयुष्य संपवल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय.  

राधा त्रिभुवन आणि तिच्या प्रांजल, कोमल आणि नंदिनी या तीन मुली... राधानं तिच्या मुलींना विष दिलं आणि स्व:त आत्महत्या केली आणि तिच्या पुरते सर्व प्रश्न सोडवले...  

सासर-माहेरच्या नातेवाईकांची फ्री स्टाईल हाणामारी

प्रांजल वय वर्ष २ कोमल वय वर्ष ५ आणि नंदिनी वय वर्ष ८... राधानं पोटच्या या तिनही गोळ्यांना विष दिलं. त्यानंतर गळफास लावून स्व:तही आत्महत्या केली. तिच्या आणि मुलींपुरती तिनं समस्या संपवली होती. पण खरी समस्या तिच्या आत्महत्येनंतर सुरू झाली. तिच्या आत्महत्येला जबाबदार कोण? मग सुरू झाली हमरी तुमरी माहेरच्यांनी सासरच्यांवर आरोप केले आणि सासरच्यांनी माहेरच्यांवर... आणि मग सुरू झाली फ्री स्टाईल हाणामारी... लाठीमार झाला आणि पोलिसांनी ही हाणामारी नियंत्रणात आणली. 

तिनही मुलीच झाल्या म्हणून... 

आत्महत्येची बाब सकाळी उघड झाली. माहेरच्यांना पोलिसांना कळवण्यात आलं... पोलीस आले... मग मृतदेह शासकीय रुग्णालयात आणले. तिन्ही मुलीच होत्या म्हणून सासरची मंडळी मुलासाठी पिच्छा पुरवत होती असा आरोप राधाचे आई-वडील गौतम आणि शोभा जाधव यांनी केलाय.  

सासरच्यांची सारवा-सारव

तर, राधाच्या नवऱ्यानं तिचा फोन उचलला नाही म्हणून तिला राग आला आणि तिनं तिन्ही मुलींसह आत्महत्या केली, अशी सारवासारव राधाच्या सासू कमलाबाई त्रिभूवन यांनी केलीय. 

राधाच्या चिमुकल्या जीवांनी तर अजून जगही पाहिलं नव्हतं... मग असं काय झालं की तिनं मुलींना विष पाजलं... तपासांती सर्व बाबी स्पष्ट होतीलच पण २ ते ८ वर्ष वयोगटातल्या तिनही मुलींचं जीवन आता थांबलंय याहून वाईट ते काय...