परभणी, लातूरमध्ये दमदार पाऊस, दुष्काळ संपला

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील छोटी धरणं, तलाव, बंधारे, नद्यानाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. यामुळे गोदाकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Updated: Sep 24, 2016, 05:46 PM IST
परभणी, लातूरमध्ये दमदार पाऊस, दुष्काळ संपला title=

परभणी : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील छोटी धरणं, तलाव, बंधारे, नद्यानाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. यामुळे गोदाकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पूर्णा तालुक्यातल्या माटेगाव इथे आठ शेळ्या वाहून गेल्यात. गंगाखेड तालुक्यातील मासोळी डॅमसह सर्वच तलाव १०० टक्के भरले आहेत. खडका बंधा-यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुळी बंधा-याचे दरवाजे निकामी झाल्याने गोदेची पाणीपातळी झपाट्यानं वाढू लागलीय. ढालेगाव बंधार्याचे सोळा दरवाजे उघडण्यात आली आहेत. 

दुसरीकडे सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प पूर्णपणे भरला असल्याने त्याचेही दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून देशभरात चर्चिल्या गेलेल्या लातूर जिल्ह्याचा दुष्काळ आता मिटला आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ११३ टक्के इतका पाऊस पडलाय. जिल्ह्यातील सर्वच नदी, नाले, ओढे, तलाव, लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्प, धरण भरभरून वाहत आहेत. 

लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या कळंब-केज तालुक्याच्या सीमेवरील मांजरा धरणात जवळपास ७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे लातूर शहराचा पाणी प्रश्न पुढील दोन वर्षासाठी मिटला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक सुखावला आहे. मात्र चार वर्षानंतर शेतकऱ्यांसाठी येणार चांगले दिवस काही अंशी दुरावले आहेत. नदीकाठची शेती पुराच्या पाण्यामुळे वाया गेली आहे.