डॉ. नरेंद्र दाभोलकरांचं नाव वापरून गुप्तधनाचा शोध!

 गुप्तधन, अंधश्रद्धा यांविरोधात आयुष्य वेचणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नावाचा गुप्तधन शोधण्यासाठीच फायदा घेतला जात असेल तर... असा अनुभव आलाय रत्नागिरीतल्या अभ्यंकर कुटुंबियांना...

Updated: Jan 13, 2015, 11:59 PM IST
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचं नाव वापरून गुप्तधनाचा शोध!   title=

रत्नागिरी:  गुप्तधन, अंधश्रद्धा यांविरोधात आयुष्य वेचणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नावाचा गुप्तधन शोधण्यासाठीच फायदा घेतला जात असेल तर... असा अनुभव आलाय रत्नागिरीतल्या अभ्यंकर कुटुंबियांना...

रत्नागिरीजवळ मोर्वी या गावातल्या अभ्यंकर कुटुंबियांना एका विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलं. मध्यरात्री अचानक पुणे पोलीस असल्याचं सांगत १० ते १२ जणांनी अभ्यंकरांच्या घरात प्रवेश केला. डॉ. दाभोलकरांच्या हत्येतले मारेकरी तुमच्या घरात लपले आहेत त्यामुळं घराची झडती घ्यावी लागेल अशी बतावणी त्यांनी केली. त्यानंतर अक्षरशः या टोळक्यानं अभ्यंकरांच्या घरात धुमाकूळ घातला..

घरातल्या महिलांना धमकावत देव्हाऱ्यासह घराची पूर्ण उलथापालथ केली. अखेर काही तासांनंतर हे टोळकं घरातून बाहेर पडलं. त्यांच्या गाड्यांचा नंबर पोलिसांना दिल्यावर पूर्णगड पोलिसांनी या टोळक्याला जेरबंद केलं. 

मुंबई, देवरूख, इचलकरंजी, शाहूवाडी, कोल्हापूर अशा विविध ठिकाणांहून आरोपींना अटक करण्यात आलीय. यातला एकजण इचलकरंजीतला शिवसेनेचा माजी पदाधिकारीही आहे. अभ्यंकर यांच्या घरात ८५ कोटी रूपयांचं गुप्तधन होतं, अशा संशयावरूनच या टोळक्यानं घरावर हल्ला केल्याचं मान्य केलंय. गुप्तधनाच्या लालसेनं एका कुटुंबाला त्रास देण्याचा हा प्रकार धक्कादायकच. पण त्यापेक्षाही धक्कादायक गुप्तधन शोधण्यासाठी डॉ. दाभोलकरांचंच वापरलेलं नाव.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.