हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नगरी, ठाणे : ९६व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे शानदार उद्घाटन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यांनी यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासात मराठी नाटकाचे योगदान लक्षात घेऊन मुंबईत भव्य नाट्य संग्रहालय उभारणार असल्याची घोषणा केली.
ते पुढे म्हणालेत, संमेलन कसं असावं, ठाण्यासारखं. मराठी माणसाला अभिमान वाटेल व रंगभूमीचे वैभव काय आहे हे पुढील पिढीला सांगण्यासाठी या नाट्यसंग्रहालयाचा निश्चित उपयोग होईल. महाराष्ट्र हा नाट्यवेड्यांचा असून मराठी नाटकाने चित्रपटसृष्टीलाही अनेक कलाकार दिले आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासात मराठी नाटकाचे योगदान लक्षात घेऊन मुंबईत भव्य नाट्य संग्रहालय उभारणार आहोत.
नाट्यसंमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा फय्याज शेख यांनी त्यांच्या कारकीर्दीत केलेल्या कार्याचा उद्धव ठाकरे यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, तुम्ही मर्यादेत राहून चांगलं काम करून दाखवलं. फय्याज यांनी आपल्या भाषणात नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्याकडे काही मागण्या केल्या.
पूर्वीच्या काळी संस्थानिके आणि राजे यांचा कलावंतांना राजाश्रय असायचा. विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ यालाही राजाश्रय लाभला होता. त्याच धर्तीवर आता लोकप्रतिनिधींनी भरघोस बक्षिसांच्या आधी नाट्यस्पर्धा घ्याव्यात. आयपीएलच्या धर्तीवर त्याचे आयोजन करावे आणि आमदार, खासदार यांनी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेले नाटक दत्तक घ्यावे. त्याचे महाराष्ट्रभरात प्रयोग करावेत! अशी सूचना ९६ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केली.