रायगड : मेच्या सुरुवातीलाच राज्यामध्ये होत असलेल्या अवकाळी पावसानं कोकणालाही चांगलंच झोडपून काढलं. या पावसामुळे शेतक-यांचं मात्र चांगलंच नुकसान झालं.
गेले दोन दिवस रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसानं भात पिकाचं नुकसान केलंय. मेमध्ये शेतक-यांची भातकापणीची लगबग सुरु असते. उन्हाळी भात शेती पीक मोठ्या संख्येनं लाखो हेक्टरवर शेतकरी पीक घेतात. त्यात अवकाळी पावसानं शेतक-याची चिंता वाढवलीय.
जिल्ह्यात कापणी आणि झोडणीची कामं सर्वत्र सुरु आहेत. शेतावरच उघड्यावर भाताची झोडणी करण्यात येत असल्यानं शेतात कापणी केलेलं भात पीक पाऊसाच्या पाण्यानं भिजून गेलंय.
तर शेतात उभं असलेलं पीक हे काही ठिकाणी सोसाट्याच्या वा-यानं आडवं झालंय. असाच अवेळी पाऊस पुढचे काही दिवस मुक्कामी राहिला तर शेतक-याच्या हातातोंडाशी आलेलं पीक नष्ट होण्याची चिंता शेतक-यांना सतावतेय.