नाशिक : राज्यभरात अचानक झालेल्या अवकाळी पावसानं बळीराजासमोर नवं संकट उभं राहीलंय. काल दुपारपासून नाशिक, पुणे, मुंबई, ठाण्याच्या विविध भागात मोठ्याप्रमाणात पाऊस झालाय.
नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी आणि परिसरात हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालं. त्याचप्रमाणे अवकाळी पावसाच्या तडाख्यानं नाशिक जिल्ह्यातील शेतीला चांगलाच फटका बसलाय. इगतपुरी त्र्यंबक तालुक्यातील अनेक आदिवासी गावागावातील भात शेती संकाटात आली आहे. कापणीला आलेलं पीक पुन्हा ओलं झाल्यानं तांदूळ खराब होण्याची शक्यता आहे.
या वर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यानं भात लावणी निम्म्याहून घटली होती.त्यातच या संकाटानं आदिवासी कुटुंब उघडयावर येणार आहेत. नाशिकमध्ये पिंपळगाव, दिंडोरी, निफाड परिसरात द्राक्ष बागांवर रोगराईच संकट आलंय. गारपीट झाली नसल्यानं शेतकरी आहे ते पीक वाचविण्याचा प्रयत्न करतोय. नांदगाव, सटाणा, मालेगाव, मनमाड भागातही पावसाने हजेरी लावली असून कांदा आणि मका पिक पाण्यात ओलं होऊ नये या काळजीनं शेतकरी त्रस्त आहेत.
गेल्या दोन दिवसात तीन-चार तासाच्या पावसानंतर आजही ढगाळ वातावरण कायम आहे. तर पुणे जिल्ह्यातही रात्रभर पाऊस सुरू होता. शहराच्या विविध भागात पावसामुळे वाहतूकीचे तीन तेरा वाजले. जिल्ह्याच्या सर्वच भागातून कमी अधिक प्रमाणात पावसानं हजेरी लावल्याची माहिती पुढे येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.